लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात सहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:16 AM2018-08-21T01:16:16+5:302018-08-21T01:16:59+5:30
राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परिक्षेत्रामध्ये १ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१८ या कालावधीत एकूण ५४१ सापळे रचून कारवाई करण्यात आली असली तरी हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत सातने कमी झाले आहे़
नाशिक : राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परिक्षेत्रामध्ये १ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१८ या कालावधीत एकूण ५४१ सापळे रचून कारवाई करण्यात आली असली तरी हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत सातने कमी झाले आहे़ यामध्ये नाशिकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईचा विचार करता राज्यात ते सहाव्या क्रमांकावर आहे़ २०१७ मध्ये याच कालावधीत ७९ सापळे लावण्यात आले होते, तर यावर्षी केवळ ४८ सापळे लावण्यात आले असून, गतवर्षीच्या तुलनेत ३१ ने घट झाल्याचे दिसून येते़ त्यामुळे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई थंडावली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परीक्षेत्रांमधील गत सात महिन्यांमध्ये ५११ यशस्वी सापळे रचण्यात आले असून, त्यामध्ये अपसंपदेचे १४, तर अन्य भ्रष्टाचाराचे १६ असे एकूण ५४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे, लाच मागण्याचे वाढते प्रमाण त्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तसेच खासगी लोकांचा सहभाग वाढला आहे. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राज्यभरात कारवाई केली जाते़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या सापळ्यांच्या संख्येत सातने घट झाली आहे़
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राज्यभरात केलेल्या कारवाईत ९२ लाख ६५ हजार ९७८ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात केली आहे, तर अपसंपदा प्रकरणी एकूण ६ कोटी १ लाख ३५ हजार ४५ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. गत सात महिन्यांमध्ये ५११ यशस्वी सापळे रचून कारवाई करण्यात आली.
६९६ आरोपींना अटक
शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकसेवक आणि खासगी व्यक्ती असे मिळून एकूण ६९६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत १ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१८ मध्ये न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांपैकी ३५ खटल्यांचे दोषारोप सिद्ध झाले आहेत़ यामध्ये ४३ आरोपींना शिक्षा झाली असून, त्यांना ८८ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़