नाशिक : त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सध्या सुरू असलेल्या पथदर्शी स्मार्ट रोडमुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असल्या तरी त्या दूर करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हा रस्ता पूर्ण झाला की तो केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आदर्श आणि रमणीय ठरणार असल्याने पर्यटनस्थळ ठरेल, असा दावा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी व्यक्त केला आहे.स्मार्ट रोडचे काम रखडल्याने सध्या अत्यंत नाराजीचे वातावरण आहे. १.१ किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे, परंतु एवढे करूनही संकल्पनेनुसार काम होईल किंवा नाही याविषयी शंका आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी रस्ता कधी पूर्ण होणार हे स्पष्ट सांगितले नसले तरी सध्या रस्त्याच्या कामामुळे काही घटकांना अडचणी येत असून त्या दूर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.रस्त्याच्या कामाचे नियोजन करतानाच या मार्गावरील शाळा आणि अन्य शासकीय कार्यालये यांचा विचार करण्यात आला होता. त्यामुळे सर्वप्रथम मेहेर ते सीबीएस या टप्प्याचे काम सुरू झाल्यानंतर तीन शाळांना स्टेडियम ग्राउंडच्या बाजूने रस्ता तयार करून देण्यात आला होता. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यामुळे अशोकस्तंभ ते मेहेर या दरम्यानचा रस्ता वेळेत पूर्ण झालेला नाही, असे सांगून त्यांनी या मार्गावर अनेक अडचणी आल्याने त्यास विलंब झाल्याचे मान्य केले. परंतु उर्वरित रस्त्याचे आणि दुसऱ्या बाजूचे काम अगोदरच्या रस्त्यापेक्षा वेगाने होईल, अशी ग्वाही दिली.या रस्त्यावर फुटपाथ, सायकल ट्रॅक, स्मार्ट बस स्टॉप, लॅँड स्केपिंग आणि बसण्यासाठी बाक अशाप्रकारच्या व्यवस्था असतील, परंतु वायफायसारखी सुविधाही असेल त्यामुळे आज कठीण वाटणारा रस्ता पर्यटनस्थळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ५१ कामांचे प्रस्ताव होते. त्यातील बहुतांशी प्रकल्प हे शहरवासीयांना सूचनांचा विचार करून तसेच निकषात बसतील अशा पद्धतीने करण्यात आले आहेत. स्मार्ट रोड हा गावठाणाला जोडणारा असला पाहिजे, या निकषात बसणारा आणि अत्यंत रहदारीचा मार्ग म्हणून त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा मार्ग निवडण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी हाच रस्ता का निवडला या प्रश्नाचे उत्तर दिले.
स्मार्टरोड... रस्ता नव्हे, पर्यटनस्थळ ठरेल! : प्रकाश थविल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:29 AM