नाशिक : दरोडा, घरफोडी, खूनाचा प्रयत्न, खंडणी वसूलीसारखे गंभीर गुन्हे जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात संघटितपणे घडविणारा कुख्यात गुंड ताहीर जमाल शाहीद उर्फ ताहीर डॉनच्या (३०, रा.गोल्डननगर, मालेगाव) मुसक्या आवळण्यास अखेर ग्रामिण पोलिसांना यश आले. त्याच्याविरूध्द एकूण ३७ गुन्हे मालेगावच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल असून मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याविरूध्द ‘मोक्का’ची कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ताहीर हा मालेगावच्या विविध गुन्ह्यात पोलिसांना मागील दोन वर्षांपासून हवा होता. त्याच्या सात साथीदारांना पोलिसांनी अटक केली; मात्र ताहीरच्या ‘लोकेशन’बाबत कुठलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. त्याने परराज्यात वास्तव्य क रत टोळीमार्फत संघटितरित्या मालेगाव तालुक्यात जबरी गुन्हे घडवित कायदासुव्यवस्थेला धोका पोहचवित होता. एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक के.के.पाटील, सहायक निरिक्षक संदीप दुनगहु, गोरक्षनाथ संवत्सकर, देविदास गोविंद, हेमंत गिलबिले, सचिन धारणकर, दिनेश पवार आदिंच्या पथकाने गुजरातमधील अहमदाबाद, सुरत या शहरांमध्ये धाव घेतली. या दोन्ही शहरांमध्ये ताहीरचा शोध घेत शिताफीने त्याला अहमदाबादमधून ताब्यात घेतले. तसेच त्याचे साथीदार अमीन अरमान शहा उर्फ अम्मु (२१,रा. सलीमनगर, मालेगाव), अतीक अमीन शेख (२४, रा.सुरत) यांना अटक केली. या तीघांनी छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल दरोड्याच्या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यांची कबुली दिल्याचे सिंह यांनी सांगितले.
मालेगावच्या कुख्यात गुंडाच्या अहमदाबादमध्ये बांधल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 7:54 PM
एकूण ३७ गुन्हे मालेगावच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल असून मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याविरूध्द ‘मोक्का’ची कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठळक मुद्देदरोड्याच्या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यांची कबुलीताहीर डॉनविरूध्द ‘मोक्का’ची कारवाई