हनुमानाचे दर्शन घेणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 12:48 AM2021-09-17T00:48:41+5:302021-09-17T00:49:53+5:30
जेलरोडवरील लोखंडेमळा येथे रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीचे बाहेरून वाकून दर्शन घेत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोनसाखळी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटनाा गुरुवारी (दि. १६) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
नाशिकरोड : जेलरोडवरील लोखंडेमळा येथे रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीचे बाहेरून वाकून दर्शन घेत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोनसाखळी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटनाा गुरुवारी (दि. १६) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. शहर व परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना थांबता थांबत नसून दररोज सोनसाखळी चोरीच्या घडणाऱ्या घटनांनी पोलिसांसह महिलांच्याही नाकीनऊ आणले आहे. सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुष्पकनगर येथील देवी भक्ती सोसायटीत राहणाऱ्या आशा सदाशिव तेजाळे (६३) या गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सैलानी बाबा दर्गा येथे शुगर तपासणी करण्यासाठी रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी जुना सायखेडा मार्गावरील विठ्ठल मंगल कार्यालयासमोर रस्त्यावरच असलेल्या श्री हनुमान मंदिरासमोर तेजाळे काही मिनिटांसाठी थांबल्या आणि वाकून दर्शन घेत असताना अचानक दुचाकीने आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील लटकणारी सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी सकाळी ६ वाजेपासून १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी व गस्त करण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.