नाशिक : भाजपाला राज्यात घवघवीत यश मिळाल्याने हा पक्ष सत्तेवर येणे अटळ असून, तसे झाल्यास नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेल्या चार भाजपा उमेदवारांपैकी एकाला तरी मंत्रिपद मिळू शकते, असे मत मांडले जात आहेत. त्यादृष्टीने संबंधितांनी हालचाली सुरू केल्या आहेत.राज्यात सर्वच पक्ष स्वबळावर लढत असताना, भाजपाने १२३ जागा मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे. पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, मध्य नाशिक आणि चांदवड-देवळा मतदारसंघातून या पक्षाचे उमेदवार निवडून आले आहे. यंदाच्या निवडणुकाच मुळी स्वबळावर झाल्या. त्यात भाजपाला गत विधानसभेच्या तुलनेत चौपट यश मिळाले आहे. त्याचा विचार करता एक तरी मंत्रिपद (किमान राज्यमंत्री) या चार निर्वाचित उमेदवारांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे. अन्य मागासवर्गीय म्हणून बाळासाहेब सानप आणि प्रा. देवयानी फरांदे हे दावेदारी करू शकतात. देवयानी फरांदे उच्चशिक्षित महिला म्हणून दावेदारी करू शकतात. दुसरीकडे मराठा कार्ड म्हणून डॉ. राहुल अहेर आणि सीमा हिरे हेदेखील दावेदारी करू शकतात. अर्थात, भाजपाचे सत्तेचे गणित कसे जुळते या सर्वावर हे अवलंबून आहे. त्यातही निवडून आलेले सर्वच उमेदवार प्रथमच विधिमंडळात पाऊल ठेवणार असल्याने त्याबाबत विचार होऊ शकतो. अशा स्थितीत मंत्रिपद नाही तर किमान महामंडळे मिळतील, अशी अपेक्षा आहे. तथापि, नाशिकला एक तरी मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा भाजपाचे पदाधिकारी बाळगून आहेत. (प्रतिनिधी)
...तर नाशिकला मंत्रिपदाची लॉटरी?
By admin | Published: October 19, 2014 10:13 PM