नाशिक : साडी नेसलेल्या एका बांधेसुद तरुणीचे छायाचित्र मित्राने मोबाइलवर पाठविले आणि दुसऱ्या मित्राने त्या छायाचित्रावर क्लिक केले. त्या तरुणीचे छायाचित्र स्क्रीनवर मोठे होताच तो तरुण घायाळ झाला... कारण त्या तरुणीच्या चेहºयावर होता माकडाचा चेहरा.बागी चित्रपटाचा फुल मुव्ही पहा म्हणून एकाला मोबाइल व्हिडीओ आला असता त्याने तो ओपन करताच तो तरुणही आश्चर्यानेच उडाला... कारण त्यावर गाणे लागले ‘एप्रिल फूल बनाया...’ सोशल मीडियावर अशाप्रकारची धम्माल मस्ती आज दिवसभर सुरू होती. एप्रिल फूलच्या निमित्ताने तरुण-तरुणींनी आपल्या मित्र-मैत्रिणींना टोपी घातली. एप्रिल महिन्यातील पहिल्या तारखेला रविवार असल्याने शाळा, कॉलेजात मित्र-मैत्रिणींना समोरासमोर एकमेकांना मूर्खात काढता आले नाही. मात्र मोबाइलचा वापर करीत लघुसंदेशाच्या माध्यमातून एकमेकांची फिरकी घेतली गेली. कुणालाही आकर्षित करतील अशा सुंदरींचे छायाचित्र आणि त्या खाली असलेल्या लिंक्स ओपन करून अनेक जण एप्रिल फूलच्या जाळ्यात अडकले. सेलिब्रेटींच्या छायाचित्रांचे विडंबन करून मनोरंजन करण्यात आले. अनेक मित्र-मैत्रिणींनी आपल्या मित्रांना विशिष्ट ठिकाणी बोलावून त्यांना गुंगारा दिला. तर काहींनी सिटी सेंटर मॉलमध्ये भेटण्याचे सांगून त्याला आम्ही खालच्या मजल्यावर आहोत, पुन्हा वरच्या मजल्यावर आलोय असे सांगत चांगलेच वेड्यात काढले. एका मित्रांच्या गु्रपने आपल्या मित्राची दुचाकी लपवून ठेवत आणि त्या जागेवर खडूने काहीतरी लिहिले. दुचाकी ट्रॅफिक पोलिसांनी नेल्याचे सांगून त्याची फिरकी घेतलीच परंतु पोलिसांना भरावा लागणारा दंड मात्र मित्रांनी वसूल केला. तरुण-तरुणींच्या धम्माल मस्तीने त्यांचे मित्र-मैत्रिणी चांगलेच ‘मामा’ बनले. शूटिंगसाठी अमुक अमुक स्टार आलाय असे सांगून मित्रांना गंगापूरपर्यंत सफरही घडविली. पंडित कॉलनीतील एका चहाच्या दुकानावर आलेल्या पाच तरुणांनी चार कट चहा आणि एक फुलची आॅर्डर दिली. चौघा मित्रांनी आपापला चहा उचलला. पाचव्या मित्राने चहाची विचारणा केली तेव्हा त्याला एकाने खिशातील गुलाबाचे फूल काढून दिले.