सोग्रसला जि.प. शाळेत विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 10:59 PM2021-05-04T22:59:09+5:302021-05-05T00:51:09+5:30
चांदवड : तालुक्यातील सोग्रस या अवघ्या १,५४२ लोकसंख्या असलेल्या गावाने आदर्श निर्माण करत शासनाच्या मदतीची वाट न बघता जिल्हा परिषदेच्या शाळेतच विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. जमिनीवरच सुमारे २५ ते ३० गाद्या टाकून गावातील रुग्णांची सोय केली आहे.
चांदवड : तालुक्यातील सोग्रस या अवघ्या १,५४२ लोकसंख्या असलेल्या गावाने आदर्श निर्माण करत शासनाच्या मदतीची वाट न बघता जिल्हा परिषदेच्या शाळेतच विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. जमिनीवरच सुमारे २५ ते ३० गाद्या टाकून गावातील रुग्णांची सोय केली आहे.
गावातील संस्थात्मक विलगीकरणामुळे येथील रुग्णसंख्या आता केवळ सहावर आली आहे. विलगीकरणामुळे रुग्ण कमी होण्यास मदत झाल्याची माहिती माजी सभापती भास्कर गांगुर्डे, सरपंच परशराम गांगुर्डे, उपसरपंच मीराबाई शिंदे, ग्रामसेवक पुष्पा भोये यांनी दिली.
गेल्यावर्षी पहिल्या लाटेत या सोग्रस गावात एकही रुग्ण नव्हता, मात्र थोडे जरी नियम मोडले आणि दुर्लक्ष केले तर रुग्णसंख्या कशी वाढते याचा अनुभव दुसऱ्या लाटेत आला. दि. १६ मार्च रोजी एक रुग्ण आढळला व त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वच गाव घाबरले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील, आरोग्य सेवक व ग्रामस्थांनी ही बाब हेरली आणि दि. १७ ते २७ मार्च या कालावधीत पूर्ण गाव बंद करून जनता कर्फ्यू पाळला.
सर्व व्यावसायिकांची कोरोना तपासणी करून घेतली. गावात दर दिवसांनी जंतुनाशक फवारणी केली. गावात प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर वाटप केले गेले. हात धुण्याचे प्रात्यक्षिक अनेक ठिकाणी घेण्यात आले. मास्क लावणे , सामाजिक अंतर ठेवणे, शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली. जे लोक नियम पाळत नव्हते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
परिसरातील किराणा, हॉटेल, सर्व दुकाने यांना कोरोना विषाणूपासून सतर्क राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. कोरोना कमिटीची स्थापना करून त्यांना विशेष अधिकार दिले. थर्मामीटर, थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने घरोघरी जाऊन शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनिसांमार्फत तपासणी केल्याने रुग्णसंख्या कमी होण्यात यश आले.