पोलिसांच्या व्हॉट््सअॅपवरील १८२ पैकी १५२ तक्रारींचे निराकरण
By admin | Published: September 28, 2016 01:11 AM2016-09-28T01:11:58+5:302016-09-28T01:12:19+5:30
पोलिसांच्या व्हॉट््सअॅपवरील १८२ पैकी १५२ तक्रारींचे निराकरण
नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैधधंदे, गुन्हेगारी, वाहतूक समस्या, टवाळखोरी याबाबत नागरिकांना बिनदिक्कतपणे तक्रार करता यावी यासाठी ९७६२१००१०० हा व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला आहे़ या क्रमांकावर आतापर्यंत १८२ नागरिकांनी विविध तक्रारी केल्या असून, त्यापैकी १५२ तक्रारींचे निराकरण केल्याची माहिती पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली़
सिंघल यांनी सांगितले की, या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मी स्वत: हाताळत असून, यावरील प्रत्येक तक्रारींची दखल घेतली जाते़ शहरातील गुन्हेगारी, वाहतूक समस्या, टवाळखोरी यांबाबत तक्रार करण्यास नागरिक सहसा पुढे येत नाहीत़ मात्र या क्रमांकामुळे नागरिक तक्रारींसाठी पुढे येत असून, या तक्रारकर्त्यांचे नावही पूर्णत: गुप्त ठेवले जाते़ या क्रमांकावर आतापर्यंत अवैध धंदे, टवाळखोर, वाहतूक कोंडी, फसवणूक, इतर तक्रारींबरोबरच जिल्हाबाहेरील अवैध धंद्याचे फोटो व व्हिडीओसहीत तक्रारी आल्या आहेत़
पोलीस आयुक्त व्हॉट््सअॅपवर तक्रार आल्यानंतर ज्या ठिकाणची तक्रार आहे. त्या विभागातील पोलीस उप आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना त्वरित पाठविले जाते़ यानंतर या तक्रारीबाबत काय कारवाई केली याबाबतचा पाठपुरावाही केला जातो़ सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी नाशिकरोड येथील जुगार अड्ड्याची तक्रारही व्हॉट््सअॅपवर आल्याची माहिती दिली़
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या या व्हॉट््सअॅप क्रमांकावर जिल्ह्याबाहेरील अवैधधंदे, टवाळखोरीच्याही तक्रारी आल्या आहेत़ या तक्रारींबाबत तेथील संबंधित पोलीस अधीक्षक वा पोलीस आयुक्तांना कळविण्यात आल्याचेही सिंघल यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
१३४ बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात यश
पोलीस आयुक्तालय हद्दीतील २००८ ते २०१६ या आठ वर्षांच्या कालावधीत एक हजार ४४३ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे़ या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे तीनही युनिटमार्फत संयुक्त मोहीम राबविण्यात आली होती़ १० ते २४ सप्टेंबर या कालावधीत राबविलेल्या या शोधमोहिमेत ५०२ बेपत्ता व्यक्तींच्या घरी जाऊन चौकशी केली असता १३४ व्यक्ती घरी आढळून आल्या़ मात्र या घरी आलेल्या व्यक्तींबाबत संबंधित कुटुंबीयांना पोलिसांना माहितीच दिली नसल्याचे समोर आहे़
शहरातील सीसीटीव्ही-साठीचा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे़ नागरिकांना आपल्या तक्रारी बिनदिक्कतपणे मांडता याव्यात यासाठी ९७६२१००१०० हा व्हॉट््सअॅप क्रमांक देण्यात आला होता़ या क्रमांकावरील तक्रारींकडे मी स्वत: जातीने लक्ष देतो तसेच त्वरित कारवाईच्या सूचना संबंधित विभागाला देतो़ यामुळे कारवाई झाल्यानंतर नागरिकांचे अभिनंदनाचे फोनही येतात़ यामुळे शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे, वाहतूक कोंडी, टवाळखोर यांना आळा बसला असून, यापुढे उर्वरित सराईत गुन्हेगारांवर मोक्कान्वये कारवाई केली जाणार आहे़
- रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त, नाशिक़