नाशिकरोड : रेल्वेस्थानकावर पंधरा दिवसांपूर्वी सापडलेला अडखळत हिंदी बोलणारा नऊ वर्षांचा नेपाळी मुलगा महेश यास रेल्वे पोलिसांनी व्हॉट््सअॅपच्या मदतीने त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन शनिवारी त्यांच्या स्वाधीन केले. हरविलेला महेश याने आपल्या वडिलांना बघितल्यानंतर मिठी मारल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गेल्या ३१ आॅगस्टला तपोवन एक्स्प्रेसमधून उतरलेला नऊ वर्षांचा नेपाळी मुलगा हा प्रवाशांना भांबावलेल्या स्थितीत दिसून आला. प्रवाशांनी त्या मुलाला नाव विचारले असता त्याला मराठी समजत नव्हते. तसेच तो हिंदीदेखील अडखळत बोलत होता. त्याला त्याचे नाव, पत्ता काहीच सांगता येत नसल्याने प्रवाशांनी त्या नेपाळी मुलाला नाशिकरोड रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलिसांनी त्या मुलास बाल सुधारगृहात दाखल केले. दोन दिवसांपूर्वी रेल्वे पोलीस हवालदार संतोष उफाडे, चंद्रकांत उबाळे, महिला कॉन्स्टेबल सुजाता निचड हे चैनस्नॅचिंग गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी मुलींना सुधारगृहात दाखल करण्यासाठी गेले होते. रेल्वे पोलीस हवालदार संतोष उफाडे यांनी औरंगाबाद रेल्वे पोलीस ठाण्यात काम केले असल्याने त्यांनी महेश याचे फोटो औरंगाबादमधील पोलीस कर्मचारी व मित्रांच्या व्हॉट््सअॅपवर टाकून त्याची माहिती दिली. औरंगाबादचे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांनी मुलगा महेश याच्या वडिलांना औरंगाबादला शोधून महेशबाबत खात्री केली. १५ दिवसांपूर्वी हरविलेला मुलगा महेश यास ताब्यात दिले. यावेळी महेश याने वडिलांना बघताच त्यांना कडकडून मिठी मारली.
व्हॉट््सअॅपच्या मदतीने सापडला मुलगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 1:11 AM