सोनई हत्याकांडः जातीव्यवस्था एड्सप्रमाणे पसरू नये म्हणूनच फाशीची शिक्षा- उज्ज्वल निकम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 11:59 AM2018-01-20T11:59:48+5:302018-01-20T13:05:13+5:30
आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी, असं परखड मत मांडत नाशिक सत्र न्यायालयाने सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
नाशिकः आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी, असं परखड मत मांडत नाशिक सत्र न्यायालयाने सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
जातीचं भांडवलं करून समाजात उद्रेक करण्याचा प्रयत्न काही विघातक प्रवृत्ती करत असतात. जात आणि धर्माचा अहंकार बाळगणारे हे ठेकेदार लांडग्यासारखे मोकाट फिरू नयेत, यासाठी सत्र न्यायालयाचा हा निकाल नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. तीन दलित युवकांची निर्घृण हत्या करणाऱ्या सहा दोषींना दिलेली फाशीची शिक्षा जातीच्या ठेकेदारांमध्ये भीती निर्माण करेल, असं निकम यांनी नमूद केलं.
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांडातल्या सात आरोपींपैकी सहा जणांना सोमवारी नाशिक सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे या सहा जणांवरील आरोप सिद्ध झाले होते. त्यांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासेजवळ सोनई गावात 2013च्या जानेवारी महिन्यात तिहेरी हत्याकांड घडलं होतं. संदीप राज धनवार (वय 24), राहुल कंडारे (वय 26) आणि सचिन घारू (वय 23) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. गवत कापायच्या विळ्याने या तिघांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. हे तिघेही तरुण दलित समाजातले होते. यापैकी सचिनचं दोषींच्या कुटुंबातल्या एका मुलीवर प्रेम होतं. तो मागे हटायला तयार नाही, हे पाहून मुलीचे वडील, भाऊ आणि चुलत्यांनी सचिन आणि त्याच्या दोन मित्रांना घरी बोलावलं होतं आणि त्यांची हत्या केली होती. या क्रौर्याबद्दल त्यांना सत्र न्यायलयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच प्रत्येकाला 20 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून त्यातील 10 हजार रुपये पीडितांच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालाबद्दल अॅड. उज्ज्वल निकम यांनी समाधान व्यक्त केलं असून पीडितांच्या कुटुंबीयांनीही न्यायालयाचे आभार मानलेत.