सोनई हत्याकांड; सहा आरोपी दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:38 PM2018-01-15T23:38:58+5:302018-01-15T23:43:45+5:30
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित आॅनर किलिंग तथा सोनई तिहेरी हत्याकांडातील सातपैकी सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सोमवारी (दि़ १५) दोषी, तर एकाला निर्दोष ठरविले. येत्या गुरुवारी (दि़ १८) यातील दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे निर्घृण खून करणाºया दोषींना न्यायालय फाशी की जन्मठेपेची शिक्षा सुनावते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे़ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात मांडलेली बाजू व ५३ साक्षीदारांनी दिलेली साक्ष यामुळे आरोपींवरील दोषारोप सिद्ध झाले.दरम्यान, मयतांच्या नातेवाइकांनी आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे़
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित आॅनर किलिंग तथा सोनई तिहेरी हत्याकांडातील सातपैकी सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सोमवारी (दि़ १५) दोषी, तर एकाला निर्दोष ठरविले. येत्या गुरुवारी (दि़ १८) यातील दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे निर्घृण खून करणाºया दोषींना न्यायालय फाशी की जन्मठेपेची शिक्षा सुनावते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे़ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात मांडलेली बाजू व ५३ साक्षीदारांनी दिलेली साक्ष यामुळे आरोपींवरील दोषारोप सिद्ध झाले.दरम्यान, मयतांच्या नातेवाइकांनी आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे़
सोनई हत्याकांड प्रकरणी न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव हे सोमवारी निकाल देणार असल्याने सातही आरोपींना प्रचंड पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते़ न्यायाधीशांनी या खुनातील आरोपी रमेश विश्वनाथ
दरंदले (४३), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३८), पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले(५२), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (२३, सर्व़ रा़ गणेशवाडी, विठ्ठलवाडी, ता़ नेवासा, जि़ अहमदनगर), अशोक सुधाकर नवगिरे (३२, रा़ खरवंडी, ता़ नेवासा, जि़ अहमदनगर), संदीप माधव कुºहे (३७, खरवंडी, ता़ नेवासा, जि़ अहमदनगर) यांना दोषी तर अशोक रोहिदास फलके (४४, रा़ लांडेवाडी, सोनई, ता़ नेवासा, जि़ अहमदनगर) याच्या विरोधात पुरावा समोर न आल्याने त्यास निर्दोष ठरविले़ जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांनी ५३ साक्षीदार तपासले आहेत़ १ जानेवारी २०१८ रोजी आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादास निकम यांनी उत्तर दिले होते़ त्यानंतर निकालासाठी १५ जानेवारी ही तारीख ठेवण्यात आली होती़
या हत्याकांड प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा फाटा येथील घाडगे-पाटील महाविद्यालयाच्या त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात असलेल्या बी़एड महाविद्यालयातील एका मुलीचे सफाई कामगार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कामास असलेल्या मेहतर समाजातील सचिन घारू या मुलावर प्रेम होते. या प्रेम प्रकरणातून १ जानेवारी २०१३ रोजी सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे सचिन घारू (२३), संदीप राज धनवार (२४) व राहुल कंडारे (२६) या तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. हे तिघेही नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामास होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय जनावरांचा चारा तोडण्याच्या अडकित्त्याने तोडून कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.
या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरोधात खून, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, भारतीय हत्यार कायदा तसेच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे मुद्दे, म्हणणे ग्राह्ण धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.
५३ साक्षीदार ठाम
सोनई हत्याकांडात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तपासलेले ५३ साक्षीदार हे आपल्या साक्षीवर अखेरपर्यंत ठाम राहिले़ या हत्याकांडाच्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नसला तरी पोलिसांनी शोधलेले परिस्थितीजन्य पुरावे व या पुराव्यांची न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कडी जुळविली़ विशेष म्हणजे या खटल्यात ५३ साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झाला नाही, हे वैशिष्ट्यच आहे़
आरोपी नवगिरेचा न्यायालयात गोंधळ
त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या जेसीबीवर चालक म्हणून नोकरी करणारा अशोक नवगिरे हा पूर्वी पोपट दरंदले यांच्या शेतीवरील ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता़ त्यानेच या प्रेमसंंबंधाची माहिती दरंदले कुटुंबीयांना दिली होती़ या हत्याकांडातील आरोपी तथा दरंदले यांचा नातेवाईक अशोक फलके यास न्यायालयाने कट रचण्याच्या आरोपावरून निर्दोष मुक्त केले़ यानंतर संतप्त झालेल्या अशोक नवगिरे याने या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे ओरडून सांगत फलकेला सोडले मला का नाही, असे ओरडत न्यायालयातच गोंधळ घातला़
१ जानेवारी २०१३ रोजी अहमदनगर जिल्ह्णाच्या सोनईमध्ये ही आॅनर किलिंगची घटना घडली होती़ आंतरजातीय प्रेम प्रकरणातून मुलीचे वडील, काका यांनी सचिन घारूसह त्याच्या दोन मित्रांना बोलावून घेत त्यांची निर्घृण हत्या केली़ या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी परिस्थितीजन्य जे पुरावे होते त्यांची साखळी आम्ही न्यायालयात उभी केली़ यामधील सातपैकी सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले तर सातवा आरोपी कटामध्ये सामील नसल्याचे पुराव्यावरून समोर आले व न्यायालयाने त्याची मुक्तता केली़ तसेच शिक्षेबाबतचा अंतिम युक्तिवाद हा १८ जानेवारीला ठेवण्यात आला आहे़
- अॅड़ उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील
कठोर शिक्षा द्या
वृद्धावस्थेतील एकुलता एक सहारा असलेल्या माझ्या सचिनचा अत्यंत निर्दयपणे खून केला़ या सर्वांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यावी़ या उतारवयात मला माझ्या मुलीकडे दिवस काढावे लागत आहेत़ मुलगा असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती़
- कलाबाई घारू (मयत सचिन घारूची आई)
फाशीची शिक्षा द्या
माझ्या भावाचा निर्दयपणे खून करणाºयांना न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भावाच्या आत्म्याला शांती मिळेल़ या घटनेनंतर घरी आलेल्या मंत्र्यांनी आर्थिक मदत तसेच नोकरीचे आश्वासन दिले, मात्र चार वर्षे होऊनही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही़
- सागर कंडारे (मयत राहुल कंडारेचा भाऊ)
आमचा एकमेव सहारा
भावाचा निर्दयपणे खून होण्याच्या घटनेला चार वर्षे झाली असून, न्यायालयाने यातील सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी़ आई व माझा सचिन हा एकमेव सहारा होता़ आईला सध्या मी सांभाळत असले तरी भावाची उणीव कायमस्वरूपी राहणार आहे़
- रिनाबाई घारू (मयत सचिन घारूची बहीण)
सोनई हत्याकांडातील आरोपींना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करताना पोलीस कर्मचारी़
सोनई हत्याकांडातील आरोपींना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करताना तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त़ फलकेचा कटात सहभाग नसल्याचे उघड
सोनई हत्याकांडात दरंदले यांचा नातेवाईक अशोक फलके याच्यावर कट रचल्याचा आरोप होता़ मात्र, पोलिसांनी जप्त केलेला लाकडी दांडा व त्याचे रासायनिक विश्लेषण केलेले नसल्याने रक्ताचे डाग आढळून आले नाही़ तसेच या परिसरात असलेला मोबाइल टॉवर हा दहा किलोमीटर परिसर व्यापत असल्याने फलके हा घटनास्थळी हजर असल्याचे वा कट रचल्याचे पुरावे नसल्याचे त्याचे वकील अॅड़ राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात सांगितले़ न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरून फलके यास या खटल्यात निर्दोष ठरविले़