रब्बीच्या २३ टक्केच पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:40 AM2019-12-06T00:40:02+5:302019-12-06T00:42:56+5:30
नाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात जेमतेम २३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या असून, अजून आठ ते दहा दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास रब्बी पिकांऐवजी शेतकऱ्यांना भाजीपाल्या-शिवाय पर्याय राहणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

दरवर्षी खरिपाचा हंगाम आटोपताच शेतकºयांकडून आॅक्टोबर-अखेरीस रब्बीची तयारी करताना शेतीची मशागतीचे कामे केली जात व नोव्हेंबर महिन्यात रब्बीची लागवड पूर्ण करून डिसेंबरच्या थंडीत पिकांना पोषक वातावरण मिळत असे. यंदा मात्र खरिपाबरोबरच रब्बीचा हंगामदेखील लांबणीवर पडला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्यात जुलै, आॅगस्टपर्यंत करण्यात आल्या, त्यामुळे साहजिकच खरिपाचा हंगाम आॅक्टोबरअखेरपर्यंत लांबला. शेतातील पिके काढणीला आलेली असतानाच जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दहा ते पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्यामुळे खरिपाची पिके शेतातच जमीनदोस्त झाली तर जी काही काढून ठेवलेली पिके होती ती खळ्यातच भिजली. पावसाचा तडखा इतका जबरदस्त होता की, शेतकºयाच्या शेतात पाणी शिरून तळे साचले. पाऊस थांबल्यानंतरही कडाक्याचे ऊन पडले नाही त्यामुळे शेती भिजलेलीच राहिली. परिणामी शेतीतील आवरासावर करण्यातच शेतकरी व्यस्त झाला त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रब्बीच्या पेरणी करण्यासाठी त्याला वेळ व मशागत केलेली शेती न मिळाल्याने लागवड लांबणीवर पडली. यंदा मात्र पेरणी लांबणीवर पडल्यामुळे हरभºयाची लागवड आता होऊ शकत नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरणीखालील जमिनीवर नजीकच्या काळात भाजीपाला घेण्याशिवाय दुसरा पर्यायही शिल्लक दिसत नाही. एरव्ही नोव्हेंबरअखेरीस रब्बीची पेरण्या करून शेतकरी निर्धास्त होत असताना यंदा मात्र डिसेंबरचा पहिला आठवडा उलटत असताना जिल्ह्यातील एक लाख ३१ हजार १६१ हेक्टर रब्बीच्या क्षेत्रापैकी जेमतेम २६ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याचे प्रमाण २३ टक्केइतकेच असून, गेल्यावर्षी हे प्रमाण दुप्पटीने होते. सध्याचे हवामान पाहता, गव्हाच्या लागवडीसाठी अनुकूल वातावरण असले तरी, रब्बीचे प्रमुख पीक हरभरा आहे; परंतु त्याची पेरणी नोव्हेंबरमध्येच होणे आवश्यक आहे.