नाशिक : पावसाळा सुरू होऊन महिना झाला असला तरी जून महिन्यात जिल्ह्यात अवघ्या ९७०३७.५४ हेक्टरवर (१४.५८ टक्के ) खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे एकूण ६ लाख ६५ हजार ५८२.२० हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. खरिपात बहुसंख्य शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली असल्याचे दिसते. ४७ हजार ३९५ हेक्टरवर मक्याची पेरणी पूर्ण झाली असून, ७०९५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा पूर्ण झाला आहे. जिल्ह्यात सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस झाला त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने त्याचा पेरण्यांना फटका बसला आहे. अद्याप पेरण्यांना म्हणावा तसा वेग आलेला नाही. मागील सप्ताहात येवला, निफाड, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, आदी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे सध्या या परिसरात पेरण्यांना वेग आला असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावल्यानंतर किमान निम्मी तरी पेरणी पूर्ण होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
खरिपाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, सायाबीन, भुईमूग, आदी पिकांची थोड्याफार प्रमाणात पेरणी केली आहे. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २०३१२.२० हेक्टरवर कापूस, १०७९३.६१ हेक्टरवर तेलबिया, ७८५६ हेक्टरवर डाळवर्गीय, तर ५८०७५ हेक्टरवर तृणधान्य, तर ६५९३१ हेक्टरवर अन्नधान्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. मका, सोयाबीन, भुईमूग, मूग या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना पोळ कांदे करायचे आहेत त्यांनी सध्या मुगाची पेरणी केली असून, मूग निघाल्यानंतर त्वरित कांद्यासाठी रान मोकळे होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
चौकट-
सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांची पाठ
जिल्ह्यात काही भागात सूर्यफुलाची लागवड होत होती; मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. सूर्यफुलासाठी ३६ हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरलेले असले तरी अद्याप एकाही ठिकाणी सूर्यफुलाची लागवड करण्यात आलेली नाही. तर तिळाची अवघी ०.११ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांदा दराकडे लक्ष ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कांद्यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवले आहे.
चौकट -
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी
एकूण तृणधान्य - १३.०३
डाळी -९.२८
एकूण अन्नधान्य - १२.४३
एकूण तेलबिया - ११.३९
कापूस - ५०.३७
एकूण खरीप पेरणी - १४.५८