वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड ग्रामपंचायत हद्दीत दिवसाढवळ्या देशी विदेशी दारू विक्र ी परवाना मिळविण्यासाठी आवश्यक ठराव करण्यासाठी चक्क रात्री बोलावलेल्या ग्रामसभेकडे महिला सदस्यांनी व गावातील महिलांनी पाठ फिरवल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर आली. त्यामुळे अंधारात करण्याचा ठराव पूर्वनियोजित डाव उधळला गेला. चिंचखेड गावच्या हद्द लागत पिंपळ गाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार असून या ठिकाणी दिंडोरी व निफाड,चांदवड,कळवण,या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी टोमॅटो व कांदा विक्र ीसाठी घेऊन येतात. त्यामुळे या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांची मोठी रेलचेल आहे. यापैकी काही हॉटेल व्यावसायिकांनी चिंचखेड ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी व ग्रामसेवकांना हाताशी धरून यापूर्वी कागदोपत्री ग्रामसभा दर्शवून ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दारूविक्र ी परवाना मिळवणसाठी प्रस्ताव सादर केले. या प्रकारची ग्रामस्थांना चाहूल लागल्यामुळे मंगळवारी सकाळी पुन्हा नव्याने ग्रामसभा आयोजित करून यासंदर्भात नव्याने ठराव करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु या सभेत गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचा असलेला विरोध लक्षात घेवून ग्रामसेवक तांबे यांनी तत्काळ रात्री ८.३० वा महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचं फतवा काढून तशी सूचना वार्ता फलकावर लिहून टाकली. ही महिला ग्रामसभा असल्याने पुरु षांनी या सभेसाठी हजर राहू नये ही खास टीप या सूचना फलकावर लिहिण्यात आली हे विशेष. दिवसभर शेतात मोलमजुरी करणाºया महिला कुठलीही पूर्वसूचना न देता आयोजित महिला ग्रामसभेला कशा उपस्थित राहणार हा साधा प्रश्न ग्रामसेवक व पदाधिकाºयांना पडू नये हे विशेष मानावे लागेल. आठवड्यातून ठराविक दिवस ग्रामपंचायतीत उपस्थित राहणारे ग्रामविकास अधिकारी व पंचायत समितीने निरीक्षक म्हणून पाठविलेले विस्तार अधिकारी, सरपंच संजय पंढारे यांच्यासह वणी पोलिस स्टेशनचे अधिकारी मोठ्या फौजफट्यासह या यावेळी हजर होते मात्र उपसरपंच उषा मेधने यांच्यासह इतर महिला सदस्यांनी व गावातील महिलांनी या सभेकडे पाठ फिरवल्यामुळे ही सभा तहकूब करण्याची नामुष्की ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर आली.-------------------------------पंचायत समितीने महिला ग्रामसभा असल्यामुळे प्रत्यक्षात सभा झाली किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी निरीक्षक म्हणून माझी नेमणूक केली आहे. याबाबत ही सभा तहकूब करण्यात आली असून त्यासंदर्भात वस्तुस्थिती निष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.-पी. एस.पाटील, विस्तार अधिकारी-------------------------ग्रामविकास साधण्यासाठी महत्वाच्या विषयावर अर्ध्या रात्री ग्रामसभा बोलावली असती तर आनंद झाला असता मात्र केवळ महिला उपस्थित राहू नये व दारूविक्र ी परवान्यासाठी आवश्यक ठराव करण्यासाठी विरोध होऊ नये यासाठी अंधारात सभा घेण्याचा प्रकार निषेधार्ह आहे.-शिवानंद संधान, ग्रामस्थ, चिंचखेड
देशी दारूविक्री परवान्यासाठीची विशेष सभा उधळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 2:21 PM