पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथक
By Admin | Published: April 5, 2017 12:55 AM2017-04-05T00:55:18+5:302017-04-05T00:55:50+5:30
हेल्पलाइनचीही सुरुवात : पालकमंत्र्यांनी केले वाहनाचे उद्घाटन
नाशिक : शहरात पर्यटनासाठी देश-विदेशांतून येणाऱ्या पर्यटकांची आपत्कालीन घटना, समस्यांतून मुक्तता करण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिसांनी ‘पर्यटक पोलीस पथका’ची स्थापना केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रामनवमीच्या मुहूर्तावर काळाराम मंदिरासमोर या पथकाच्या वाहनाचे उद््घाटन करण्यात आले.
नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या सहकार्याने ‘नाशिक पोलीस पर्यटन’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या पथकाच्या शुभारंभप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, दत्तात्रय कराळे, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, पर्यटक पोलीस पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. अहिरराव व सी. एस. पाटील नगरसेवक शशिकांत जाधव आदि उपस्थित होते.
अनेकदा पर्यटकांची लूट, गैरसोय, पर्यटकांकडून नियमबाह्य भाडे आकारणे, त्यातून उद््भवणारे वादाचे प्रकार अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हे पथक काम करणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने यावेळी नाशिक पर्यटनाची माहिती देणाऱ्या पुस्तिका व पत्रकांचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)