दिवाळीच्या खरेदीला वेग
By Admin | Published: October 19, 2014 10:17 PM2014-10-19T22:17:58+5:302014-10-21T01:59:10+5:30
दिवाळीच्या खरेदीला वेग
नाशिक : दिव्यांच्या प्रकाशांनी दाही दिशा उजळवणाऱ्या दिवाळी सणाला सोमवारपासून प्रारंभ होत असल्याने बाजारात खरेदीला वेग आला आहे. पणत्या, आकाशकंदील, लाइटिंगमुळे दिवाळी लख्ख प्रकाशात न्हाऊन निघते. या वस्तूंशिवाय दिवाळी पूर्ण होऊच शकत नसल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसत आहे. याबरोबरच कपडे, फटाके, उटणे, सुगंधी तेल, अत्तर यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. बाजारात नव्याने आलेल्या वस्तूंकडे ग्राहक आकर्षित होत आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. त्यातच औद्योगिक क्षेत्रात दिवाळीचा बोनस मिळू लागल्याने त्याचे परिणाम बाजारपेठेवर दिसत असून, खरेदीसाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच गुंतलेले दिसत आहेत. त्यामुळे शहरातील मेनरोड, दहीपूल, शालिमार, नाशिकरोड परिसर गजबजला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिवाळीसाठी आवश्यक वस्तूंच्या किमतीत फारशी वाढ झाली नसली, तरी कपडे, आकाशकंदील यांच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. डिझायनर पणत्या, फायबर प्लास्टिकचा आकाशकंदील यांना चांगली मागणी असल्याने त्याची आवकही बाजारात वाढली आहे. पर्यावरणपूरक म्हणून कापडी आकाशकंदिलांना चांगला भाव आहे. चायना कंदीलही बाजारात आले असले, तरी ग्राहकांनी त्याला नापसंती दर्शविल्याने या कंदिलांचा भाव पूर्णपणे घसरला असल्याचे विक्रेते सांगतात.
नोकरदार महिलांसाठी फराळाचे पदार्थ घरी करणे शक्य होत नसल्याने त्यांच्यासाठी तयार फराळाचे खास पदार्थ विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याचे दिसते. यात शेव, चकल्या, शंकरपाळे, करंज्या या नेहमीच्या पदार्थांबरोबरच गुलकंद करंजी, चिरोटे, नारिंगी लाडू, सफरचंद बर्फी हे फराळाचे नवीन पदार्थही बाजारात आले आहेत. येत्या तीन-चार दिवसांत खरेदीची लगबग आणखी वाढणार असल्याची शक्यताही विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)