पाटोदा परिसरात कांदा लागवडीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:56 PM2020-08-01T17:56:02+5:302020-08-01T17:59:00+5:30
पाटोदा : परिसरात पोळ कांदा लागवडीस प्रारंभ झाला असून कांदा लागवडीस वेग आला आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या मजूर टंचाईने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : परिसरात पोळ कांदा लागवडीस प्रारंभ झाला असून कांदा लागवडीस वेग आला आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या मजूर टंचाईने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
पाटोदा परिसरासह पश्चिम भागात नगदी पिक म्हणून शेतकरी पोळ कांद्याची मोठया प्रमाणात लागवड करीत असतात. मागील वर्षी पोळ कांद्यास चांगला बाजारभाव मिळाला. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी मोठया प्रमाणात कांदा बियाणे टाकले असून गेल्या काही दिवसांपासून कांदा रोपे लागवडी योग्य झाली आहे. त्यामुळे परिसरात कांदा लागवडीस वेग आला आहे. परिसरातील शेतकरीवर्ग पोळ (लाल कांदा) रांगडा कांदा व उन्हाळ कांदा पिक घेतात. आगद लावलेल्या कांद्यास चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग पोळ कांद्याची लागवड मोठया प्रमाणात करीत आहे. त्या साठी पंधरा ते सोळा हजार रुपये पायली दराचे बियाणे खरेदी करून शेतकर्यांनी रोप तयार केले आहे.
मागील वर्षी पोळ व रांगडा कांद्यास चांगला दर मिळाल्याने शेतकर्यांनी तयार झालेला कांदा विक्री केला. साहजिकच कांदा बियाणे तयार करण्यास शेतकर्यांचे दुर्लक्ष झाल्याने यंदा बियाणे टंचाई निर्माण झाली आहे. एक पायली बियाणासाठी शेतकर्यांना सोळा ते सतरा हजार रुपये मोजावे लागले. तर विविध बियाण कंपनीचे बियाणेही बाजारातून गायब झाल्याने शेतकर्यांना बियाणे टंचाईचा सामना करावा लागत आहे.