ढगाळ हवामान अन् सरींचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:16 AM2021-03-23T04:16:29+5:302021-03-23T04:16:29+5:30
कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यापासून तर थेट उत्तर-मध्य व दक्षिणेच्या काही भागात अचानकपणे कमी दाबाचा पट्टा विरला गेला आहे. यामुळे राज्यातील ...
कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यापासून तर थेट उत्तर-मध्य व दक्षिणेच्या काही भागात अचानकपणे कमी दाबाचा पट्टा विरला गेला आहे. यामुळे राज्यातील वातावरणावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. कधी उकाडा तर कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस अशा विचित्र वातावरणाचा अनुभव राज्यात नागरिकांना येत आहे. विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे संकट अधिक आहे. शहरात दोन दिवसांपूर्वी पहाटे हलक्या सरी कोसळल्यानंतर सोमवारी पुन्हा सरींचा वर्षाव झाला. दुपारी दोन वाजेनंतर शहरात ढगाळ हवामान निर्माण झाले होते. शहराच्या मध्यवर्ती भागासह आनंदवली, सातपूर, कामटवाडे या परिसरात पावसाने काही मिनिटे हजेरी लावल्याने रस्ते ओले झाले होते. दुपारी चार वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात पुन्हा लख्ख सूर्यप्रकाश पडल्यामुळे वातावरणात सूर्यास्तापर्यंत पुन्हा वेगाने उकाडा वाढला होता. रात्री नागरिकांना अधिकच उष्मा जाणवला. सोमवारी शहराचे कमाल तापमान ३५.६ तर किमान तापमान १७.९ अंश इतके नोंदविले गेले. शहर व परिसरात पुढील दोन ते तीन दिवस अशाप्रकारे तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
.