नाशिक : शहर परिसरामध्ये सोमवारी (दि.३) दुपारनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले आणि काही वेळ सोसाट्याचा वादळी वारा सुटला. काही वेळेतच शहराच्या मध्यवर्ती भागासह काही उपनगरीय भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव झाला.
शहरातील मध्यवर्ती भागांसह पंचवटी, मेरी, म्हसरुळ, जुने नाशिक, द्वारका, काठेगल्ली, अशोकामार्ग या उपनगरीय भागांमध्ये शिडकावा झाला. सकाळपासून उन्हाची प्रखरपणे तीव्रता जाणवत होती. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मागील चार ते पाच दिवसांपासून दररोज दुपारनंतर शहराचे हवामान बदलत आहे. अवकाळी पावसाचे ढग सर्वत्र दाटून येऊन वादळी वारा सुटत आहे. तसेच हलक्या सरींचा वर्षाव देखील होत आहे. काही भागात सुद्धा जोरदार पाऊस झाला.
दुपारी चार वाजेपासून शहर व उपनगरीय भागातील हवामान बदलण्यास सुरुवात झाली होती. पावसाचे वातावरण तयार होऊन ढग दाटून आले. काही भागात वादळी वारा तर काही उपनगरांमध्ये सोसाट्याचा काही मिनिटे वारा सुटला. टपोऱ्या थेंबांच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटही होत होता. अवकाळी पावसाने शहराला झोडपले.
सायंकाळी साडेपाच वाजता गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, महात्मानगर परिसरात पावसाच्या सरींसह गारांचाही वर्षाव सुरु झाला. चार दिवसांपासून दुपारनंतर बदलणाऱ्या पावसाळी वातावरणामुळे वाढत्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. कमाल तापमानात काहीशी घट होऊन पारा कमी होण्यास मदत झाली. तसेच किमान तापमानही कमी झाले आहे.
_____
पश्चिम विदर्भापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत उत्तर-दक्षिण दिशांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम थेट दक्षिण-मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर होताना दिसत आहे. चक्रीय चक्रवाताची स्थिती निर्माण होऊ लागल्याने पुढील दोन दिवस पर्यंत अशाप्रकारे वादळी वारे आणि गारपिटीसह पाऊस होण्याचा धोका असल्याचे हवामान खात्याने सांगितले.