एसटी महामंडळाच्या सवलती नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:39 AM2018-12-19T00:39:23+5:302018-12-19T00:40:34+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी २४ प्रकारच्या विशेष प्रवासी सवलती दिल्या जातात. परंतु या सवलतींची पुरेशी माहिती प्रवाशांना नसल्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वगळता अन्य सवलती केवळ कागदावरच आहेत.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी २४ प्रकारच्या विशेष प्रवासी सवलती दिल्या जातात. परंतु या सवलतींची पुरेशी माहिती प्रवाशांना नसल्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वगळता अन्य सवलती केवळ कागदावरच आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर योजना, विद्यार्थी मासिक पास, विद्यार्थ्यांना सुटीत गावी जाण्यासाठी, परीक्षेला जाण्यासाठी, शालेय कॅम्पला जाण्यासाठी, आजारी आई-वडिलांना भेटण्यास जाण्यासाठीची सवलत योजना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी ५० टक्के नैमित्तिक करार सवलत, रेस्क्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता सवलत, दलितमित्र पुरस्कारप्राप्त व्यक्ती, अंध अपंग व्यक्ती, अंध-अपंग व्यक्ती व त्यांचे साथीदार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारार्थी, क्षयरोगी उपचारासाठी ५० टक्के प्रवासी सवलत, कर्करोगी असल्यास उपचारासाठी जाण्यासाठी प्रवास सवलत, कुष्ठरोगी उपचाराला जाण्यासाठीची मदत, अधिस्वीकृती पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, आदिवासी पुरस्कारप्राप्त व्यक्ती, राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, अर्जुन-दादाजी कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नागरिक, आषाढी एकादशीला प्रथम पूजेचा मान असलेले दाम्पत्य, माजी विधिमंडळ सदस्य, विद्यमान विधिमंडळ सदस्य, अपंग गुणवंत कामगार अशा घटकांना मोफत, ५० तसेच ७५ टक्केपर्यंत भाड्यात सवलत देण्याची महामंडळाची योजना आहे.
सवलतींची माहितीच नाही
यातील असे काही घटक आहेत की जे अशा सवलतींचा लाभ घेतच नाही किंवा अभावानेच लाभ घेतात. त्यामध्ये विधिमंडळाचे प्रतिनिधी, खेळाडू, कर्करोगी, क्षयरोगी, गावी जाणारे विद्यार्थी, पत्रकार यांचा समावेश आहे असून त्यांचे लाभाचे प्रमाण १५ ते २५ टक्क्याच्या जवळपास आहे.