नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील निलगिरी पर्वतावर साकारत असलेल्या माता अन्नपूर्णाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ सोहळ्यास रविवारी (दि. 18)कलश शोभा यात्रेने प्रारंभ झाला. सकाळी 9 वाजता नीलपर्वतापासून सुरू झालेली यात्रा त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांवर वाजत गाजत कुशावर्तापर्यंत पोहोचली. यात्रेमध्ये सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज , महामंडळेश्वर स्वामी सच्चिनानंद गिरी, लक्षचंडी आचार्य कल्याणनंद आचार्य कल्याणदत्त शास्त्री, प्राणप्रतिष्ठा आचार्य बाळासाहेब दिक्षित यांच्यासह देशभरातून आलेले भाविक व यज्ञात सहभागी 100 यजमान दाम्पत्य आणि त्र्यंबकेश्वरमधील नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले. या कलश यात्रेने अवघी त्र्यंबकेश्वर नागरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. गणेश पूजन, कलश पूजन, मातृका पूजन व नंतर यज्ञ मंडप प्रवेश आदि पूजाविधी रविवारी संपन्न झाले असून उद्या सकाळी 8 वाजेपासून अरणीमंथन द्वारा अग्नि प्रज्वलित करून लक्षचंडी महायज्ञाची सुरुवात होईल. हा महायज्ञ सोहळा 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून 21 फेब्रुवारी रोजी माता अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. जोतिर्लिंग मंदिराचा कलश व माता अन्नपूर्णाचे दर्शन असा अदभूत योग मिळणाऱ्या नील पर्वतावर हे मंदिर 3 एकराच्या परिसरात उभारण्यात आले असून शिवलिंग व अन्नपूर्णा मंदिर एकच ठिकाणी असलेले त्रंबकेश्वर हे देशातील दुसरे ठिकाण आहे. वस्तूकलेचा अद्वितीय नमुना असलेले हे मंदिर पूर्णता: संगमरवरामध्ये साकारण्यात आले आहे. माता अन्नपूर्णा सोबतच माता सरस्वती व माता महाकाली यांच्याही मूर्ती तेथे असून मंदिर परिसरातच भैरवनाथाच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी अध्यक्ष सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टच्या माता अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ समितीद्वारे देण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये माता अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास कलश यात्रेने आरंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 5:28 PM
त्र्यंबकेश्वर येथील निलगिरी पर्वतावर साकारत असलेल्या माता अन्नपूर्णाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ सोहळ्यास रविवारी (दि. 18)कलश शोभा यात्रेने प्रारंभ झाला.
ठळक मुद्देअन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास कलश यात्रेने आरंभनिलगिरी पर्वतावर संगमरवराचे अन्नपूर्णा मंदिर18 ते 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार लक्षचंडी यज्ञ