राज्य शासनाकडून मका खरेदी अचानक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:56 PM2018-03-01T14:56:52+5:302018-03-01T14:56:52+5:30
गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने मक्याच्या उत्पादनात पाचपट वाढ झाली आहे. व्यापा-यांनी भाव पाडल्यामुळे राज्य सरकारने आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून त्यासाठी पणन महामंडळामार्फत खरेदी केंद्रे सुरू करण्यास अनुमती दिली तसेच मका उत्पादक शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली होती.
नाशिक : शेतक-याकडून १४२५ रूपये किलो प्रमाणे मका खरेदी करून तो रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना अवघ्या एक रूपये दराने विक्री करण्याच्या आतबट्ट्याच्या व्यवहारात मोठी आर्थिक झळ बसलेल्या राज्य सरकारने पणन महामंडळामार्फत आधारभुत किंमतीत खरेदी केल्या जाणा-या मक्याची खरेदी कोणतीही पुर्वसुचना न देता अचानक बंद केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात नोंदणी केलेल्या सुमारे दिड हजार शेतक-यांकडे ५० हजार क्विंटलपेक्षाही अधिक मका पडून राहिला आहे. शासनाच्या भरवश्यावर असलेल्या शेतक-यांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने मक्याच्या उत्पादनात पाचपट वाढ झाली आहे. व्यापा-यांनी भाव पाडल्यामुळे राज्य सरकारने आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून त्यासाठी पणन महामंडळामार्फत खरेदी केंद्रे सुरू करण्यास अनुमती दिली तसेच मका उत्पादक शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली होती. नोव्हेंबर महिन्यात नोंदणीला सुरूवात करण्यात आली व ३१ डिसेंबर पर्यंत नोंदणी करणा-या शेतक-यांचाच मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात ३४५८ शेतक-यांनी नोंदणी केली होती. शेतक-यांची वाढती मागणी पाहून पणन महामंडळाने जिल्ह्यात दहा ठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू करण्याची कार्यवाही केली, मात्र गुदामांच्या उपलब्धतेमुळे काही ठिकाणी खरेदी केंदे्रे सुरू होण्यात उशीर झाला. याच दरम्यान गेल्या वर्षी आधारभुत किंमतीत खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याच्या सुचना पुरवठा विभागाला देण्यात आल्यामुळे गुदामांचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. त्यामुळे जिल्ह्यात १९२६ शेतक-यांकडून गेल्या तीन महिन्यात ९६,६३४ क्विंटल मका खरेदी करण्यात आला. त्यातील ब-याचशा शेतक-यांना अजुनही शासनाकडून पैसे मिळालेले नाहीत.
नाशिक जिल्ह्यातील दिड हजार शेतक-यांकडे अंदाजे ५० हजाराहून अधिक क्विंटल मका पडून असताना त्याची खरेदी सुरू असताना गेल्या आठवड्यात राज्य सरकारने मका खरेदी केंद्रांवरील बिलाची आॅनलाईन यंत्रणाच बंद करून टाकली आहे. परिणामी मका खरेदी केला तरी, शेतक-यांना पैसे अदा करण्यासाठी नोंदणी केल्या जाणारी वेबसाईटच बंद झाली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवरून शेतक-यांना माघारी पाठविले जात आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने शेतात काढून ठेवलेला मका वाळण्यास व त्याचे वजन कमी होण्यास सुूरूवात झाली असताना खरेदी केद्रे बंद झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.