पंचवटी : राज्यातील देवस्थान सुरू करण्यासाठी मागणी करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत मंदिर, मठ उघडण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.शासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करून देवस्थान, भजन पूजन कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एक मुखाने मागणी असताना राज्यातील सरकार ते मान्य करत नाही म्हणूनच शासनाच्या विरोधात लढा देण्यासाठी राज्यातील प्रमुख धार्मिक,अध्यात्मिक संघटना, संस्था प्रमुख देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पंथ संप्रदायाच्या प्रमुख धर्माचाऱ्यांनी एकत्र येत घंटानाद आंदोलनाचा निर्णय घेतलाआहे. शनिवारी सकाळी सर्व साधू महंत व भाविकांनी आंदोलनात सहभागी होऊन घंटानाद करून शासनाला मंदिर सुरू करण्यासाठी भाग पाडू असे भोसले यांनी शुक्ल यजुर्वेद मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला आमदार देवयानी फरांदे, आमदार अॅड. राहुल ढिकले, महंत भक्ती चरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, निवृत्तीनाथ महाराज रायते, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, रामसिंग बावरी, देवदत्त ब्रम्हाजी आदी उपस्थित होते.
शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 1:05 AM