Video - अप्रतिम! 100 ग्रॅम कापसापासून साकारली राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची मूर्ती
By अमोल यादव | Published: October 2, 2022 10:22 AM2022-10-02T10:22:16+5:302022-10-02T11:02:10+5:30
अनंत खैरनार यांनी 100 ग्रॅम कापसाचा वापर करून 11 इंच उंचीची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अनोखी कलाकृती साकारली आहे.
नाशिक - साधारणतः धातू, काळा पाषाण, लाकूड किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस या सारख्या साधनांपासून तयार केलेले अनेक शिल्प पाहायला मिळतात. मात्र नाशिकचे कलाकार अनंत खैरनार यांनी 100 ग्रॅम कापसाचा वापर करून 11 इंच उंचीची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अनोखी कलाकृती साकारली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी शिल्पकलेतून अनोखी आदरांजली अर्पण केली आहे
खैरनार यांनी यापूर्वी प्रभू श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संत नामदेव, स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा यांच्यासह अनेक देवी देवता आणि राष्ट्रपुरुषांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या शिल्पकृती 30 देशांमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, महात्मा गांधी यांचे कापूस शिल्प साकारताना वेगळी अनुभूती आल्याचे ते सांगतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा माझ्यावर बालपणापासून पगडा आहे.
स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान हे नेहमीच मला प्रेरणा देत आले आहे. गांधीजींचे विचार आणि अहिंसा आजही समाजासाठी उपयुक्त आहे. त्यासाठीच हा उपक्रम राबवल्याचं त्यांनी सांगितले. यापूर्वी खैरनार यांनी 22 किलो कापसाचा वापर करून साडेसात फूट उंच या आकाराचे महात्मा गांधींचे शिल्प साकारले होते. खैरनार यांनी यापूर्वी तयार केलेल्या विविध कलाकृतींची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
अप्रतिम! 100 ग्रॅम कापसापासून साकारली राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची मूर्ती, नाशिकचे कापूस शिल्पकार अनंत खैरनार यांची कलाकृती (व्हिडीओ- प्रशांत खरोटे) pic.twitter.com/mAltD72OEV
— Lokmat (@lokmat) October 2, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"