नाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून बोटिंग करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले गेले आणि ते मागेही पडले. पर्यटकांसाठी मौज म्हणून काही भागात बोटिंग सुरू असली प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु एकेकाळी गोदावरी नदीतून नाशिक गावठाण आणि पंचवटीला जाण्यासाठी जलप्रवास हाच पर्याय होता नावेतून प्रवास करण्याच्या अनेक पाऊलखुणा आजही टिकून आहेत. ब्रिटिशांनी बांधलेल्या व्हिक्टोरिया ब्रिजपूर्वी अनेक वर्ष अगोदर म्हणजे सुमारे २२५ वर्षांपूर्वी ही व्यवस्था होती. गोदा जलमार्गातील नाव बांधण्यासाठी त्यावेळी असलेल्या जुन्या दगडी धक्क्याच्या खुणा आजही उपलब्ध आहेत. त्याबाबत विविध पुस्तकातून त्याची माहिती घेऊन इतिहास अभ्यासक देवांग जानी या खुणा शोधून काढल्या आहेत. नाशिकचा पुरातन इतिहास असलेल्या या दगडी वास्तू जतन करण्याची मागणी जानी यांनी केली आहे. १८९५ पूर्वी पंचवटी ते नाशिक जाण्यायेण्यासाठी एकमेव जलमार्ग होता. त्याकाळी पंचवटीतून नाशिक किंवा नाशिकहून पंचवटीत जाण्यायेण्यासाठी गोदावरी नदीतून नावेद्वारे प्रवास करावा लागत असे. त्यासाठी टाळकुटेश्वर देवळाजवळ नाव उपलब्ध होत असे. तेथून नावेत बसून लोक जा ये करीत असे. नदीच्या दोन्ही तिराला उंच मनोरे दगडात बांधलेले असत. त्यावर लोखंडी साखळीने नावा बांधीत असत. पंचवटी अमरधामसमोर आणि नाशिक अमरधाम बाहेरील बांधलेले दगडी धक्के अजूनही सुस्थितीत आढळतात. नावेमध्ये प्रवासासाठी व्यक्ती मागे १ आणा दर आकारला जात असे. पावसाळ्यात पाणी कमी झाल्यावर, चांदवडकर यांच्या सांडव्यावर हमाल लोक उभे असत. हमाल लोक मनुष्याला पाठीवर घेऊन पलीकडे पोहचविण्यासाठी मजुरीपोटी एका खेपेस सहा पै घेत असे. n नदीच्या किनारी असलेल्या धक्क्याच्या ठिकाणी नाव उभ्या केल्या जात असल्याने या भागाचे नाव नाव दरवाजा असे पडले, अशीही नोंद आढळल्याचे जानी सांगतात. पुढे अनेक वर्षे नौकेद्वारे होणाऱ्या गैरसोयी बघून नाशिक शहराचे तत्कालीन असिस्टंट कलेक्टर व नाशिक नगरपालिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष काशिनाथ महादेव थत्ते यांच्या पुढाकाराने ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया पूल बांधला. पुलाचे उदघाटन तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हेरीस यांनी १४ जानेवारी १८९५ ला केले त्याची साक्ष पुलाखालील तक्ति आजही देत आहे.
गोदावरी जलप्रवासाची साक्ष देताहेत दगडी धक्के !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:42 AM
शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून बोटिंग करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले गेले आणि ते मागेही पडले. पर्यटकांसाठी मौज म्हणून काही भागात बोटिंग सुरू असली प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु एकेकाळी गोदावरी नदीतून नाशिक गावठाण आणि पंचवटीला जाण्यासाठी जलप्रवास हाच पर्याय होता नावेतून प्रवास करण्याच्या अनेक पाऊलखुणा आजही टिकून आहेत.
ठळक मुद्देदिनविशेष गोदावरी प्रकट दिन २२५ वर्षांपूर्वीच्या खुणा; मनोरे संवर्धन करण्याची जानी यांची मागणी