सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे शिवारात हॉटेलवर उभ्या असलेल्या कंटनेरमधून डिझेल चोरी करताना हॉटेलमालकाने हटकवल्यावर चोरट्यांनी हॉटेलमालक व कामगारांवर दगडफेक केल्याची घटना रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. हॉटेल मालक व कामगारांना प्रतिकार केल्यानंतर डिझेल चोरटे चोरीसाठी वापरण्यात येणारी सफारी कार सोडून पळ काढला. वावी पोलिसांनी डिझेल चोरट्यांची सफारी कार, डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारे ड्रम आणि एक मोबाइल जप्त केला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाट्यावर हॉटेल पुरोहित आहे. याठिकाणी लांब पल्ल्यावर चालणाऱ्या अवजड गाड्या थांबून जेवण करण्यासह चालक आराम करतात. बुधवारी रात्री या हॉटेलसमोर कंटनेर (एच. आर. ५५ डब्लू ७७९७) उभा करून चालक झोपला होता. रात्री दोन वाजेच्या सुमारास हॉटेलमालक महिपाल गणपत पुरोहित लघुशंकेसाठी उठले. त्यावेळी कंटनेरमधून अज्ञात तीन चोरटे डिझेल काढत असल्याच्या त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हॉटेलमधील कामगारांना उठवून चोरट्यांना हटकले असता चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पुरोहित यांच्यासह कामगार हातात लाठ्या-काठ्या घेऊन प्रतिकार करण्यासाठी येत असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्यासोबत आणलेली सफारी स्टार्म कार (एम.एच. ४३ ए.क्यू. २७७२) तेथेच ठेवून अंधारातून पळ काढला.
पुरोहित यांनी घटनेची माहिती वावी पोलिसांना दिल्यानंतर नांदूरशिंगोटे दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधाराचा फायदा घेत चोरटे फरार झाले. पोलिसांनी चोरट्यांनी आणलेली सफारी कार, त्यात डिझेलचे सात रिकामे ड्रम, एका ड्रममध्ये पाच लिटर डिझेल व कारमध्ये असलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाइल जप्त केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात डिझेल चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी वावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विकास काळे करीत आहेत.
----------------
डिझेल चोरीसाठी उंची गाड्यांचा वापर
नाशिक-पुणे व सिन्नर-शिर्डी महामार्गावर डिझेल चोरी करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. डिझेल चोरीसाठी चोरट्यांकडून उंची गाड्यांचा वापर केला जात असल्याचे या घटनेवरून दिसून येते. उंची गाड्या डिझेल चोरीसाठी वापरल्यानंतर कोणाला संशय येत नाही. गोंदे शिवारात तर डिझेलसाठी सफारीसारख्या उंची कारचा वापर करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक सागर कोते यांनी सांगितले. या प्रकरणातून डिझेल चोरीचे रॅकेट उडकीस येण्याची शक्यता कोते यांनी व्यक्त केली.
---------------
‘डिझेल चोरीसाठी वापण्यात आलेली सफारी कार, डिझेलचे ड्रम आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे. या मोबाइलवरून चोरट्यांचा तपास करण्यात यश आले आहेत. लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल. यापूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात याच सफारी कारमध्ये हत्यार (कट्टा) बाळगल्याप्रकरणी आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच चोरट्यांचा छडा लावून डिझेल चोरीचे रॅकेट उघड होईल.
- सागर कोते, सहायक पोलीस निरीक्षक, वावी पोलीस ठाणे
नाशिक-पुणे महामार्गावर डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारी सफारी कार वावी पोलिसांनी जप्त केली आहे. (११ सिन्नर ३)
===Photopath===
110221\11nsk_36_11022021_13.jpg
===Caption===
११ सिन्नर ३