शेतकरी कर्जमुक्तीसाठी १४ आॅगस्टला रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 04:07 PM2017-07-25T16:07:46+5:302017-07-25T16:07:46+5:30
१४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी रास्ता रोको व रेल रोको करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टीमेटमनुसार येत्या १४ आॅगस्टपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास १४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी रास्ता रोको व रेल रोको करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी पुणे येथे शेतकरी सुकाणू समितीची बैठक होऊन शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलनाचा अखेरचा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी गेल्या १ जूनपासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप व त्यानंतर दाखल झालेले गुन्हे तसेच नाशिक येथे राज्यव्यापी बैठकीत करण्यात आलेल्या ठरावांवरील कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करून एकाही शेतकऱ्याला महिना उलटूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कर्जमाफी देताना राज्यातील शेतकऱ्यांमध्ये भेदाभेद न करता सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी यासाठी पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू हे विधानसभेत तर आमदार जयंत पाटील हे विधान परिषदेत ठराव मांडतील, या ठरावाच्या बाजूने पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय आमदारांना आवाहन करण्यात येईल. जे आमदार किंवा मंत्री या ठरावाच्या बाजूने मतदान करणार नाहीत त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी फिरू देणार नाहीत, तसेच मंत्र्यांना गावबंदी करण्याचे ठरविण्यात आले. राज्यात एकाच वेळी १४ आॅगस्ट रोजी सर्व राज्य व महामार्गावर चक्काजाम करण्यात येईल, तसेच १५ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सुकाणू समितीने घेतलेल्या या निर्णयात राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी गावोगावी आगामी काळात बैठका, मेळावे घेण्याचे तसेच शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे ठरविण्यात आले.