पेठ येथे विरोधकांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:54 AM2017-11-07T00:54:28+5:302017-11-07T00:54:35+5:30
तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व कॉँग्रेसला सोबत घेत नाशिक -बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर तब्बल दहा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पेठ : तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व कॉँग्रेसला सोबत घेत नाशिक -बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर तब्बल दहा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माकपाचे आमदार जे. पी. गावित, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मागील आठवड्यात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. निराधार योजनेचा लाभ मिळावा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, वनजमीनीचा प्रश्न मार्गी लागावा, घरकूल योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, नदी जोड प्रकल्प तात्काळ थांबवा, पर्यटन विकास करावा, भारनियमन रद्द करावे, शासकिय अधिकाºयांच्या कामकाजाची चौकशी करावी . आदी मागण्यांसाठी माकपा, किसानसभा, राष्ट्रवादी कॉग्रेस व मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पेठ शहरातून मोर्चा काढत जूना बस स्टँडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉ. काशिनाथ भंडागे, मनसेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, जिल्हा किसान सभेचे सरचिटणीस सावळीराम पवार, कॉ. इंद्रजीत गावीत, अॅड. दत्तू पाडवी, कॉग्रेसचे भिका चौधरी, कॉ. सुनिल मालुसरे, आमदार नरहरी झीरवाळ, आ. जे.पी. गावीत आदींनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष निवृत्ती महाले, माकपाचे तालुकाध्यक्ष कॉ.देवराम गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, नामदेव मोहाडकर, नामदेव हलकंदर, जाकीर मनियार, गिरीश गावीत, सुरेश भिवसन यांच्यासह माकपा, राष्ट्रवादी, मनसे, कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान उपविभागीय अधिकारी उदय किसवे, तहसीलदार हरिष भामरे, गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम यांच्यासह सर्व शासकीय विभागप्रमुख उपस्थित होते.
भर उन्हात कार्यकर्त्यांचा रस्त्यावर डेरा
दुपारी २ वाजेपासून पेठच्या रस्त्यावर भर उन्हात कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. कडक उन्हातही महिला कार्यकर्त्यांसह नागरीक बसून होते. दुपारी १ वाजेपासून सुरू झालेले आंदोलन ९ तासांपेक्षा अधिककाळ सुरू होते. दोन्ही आमदारांसह जवळपास तीन हजार सर्व पक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून होते वन जमिनीच्या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी येत नाही तो पर्यत माघार न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिल्याने स्थानिक प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. आंदोलनामुळे दोन्ही बाजूकडची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.