देवळा : येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर दुष्काळामुळे शेजारील तालुक्यातून रोजगारासाठी येणाऱ्या शेतमजुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी आडवले म्हणून सटाणा व मांगीतुंगी येथील संतप्त शेतमजूर महिलांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली. देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी महिलांची समजूत घातल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.सटाणा तालुक्यातील सटाणा व मांगीतुंगी येथील पन्नास ते साठ महिला कांदे लागवडीसाठी तसेच मका कापणीसाठी खासगी वाहनाने देवळा येथे आल्या होत्या. दिवसभराचे कामकाज आटोपून सायंकाळी सव्वासहा वाजता घरी परत जात असताना देवळा शहरातील विंचूर प्रकाशा महामार्गावर देवळा वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवली व कागदपत्रांची मागणी केली, गाडी पोलीस ठाण्यात जमा केली. त्यावेळी गाडीतील मजूर महिलांनी आम्हाला घरी लवकर जाऊ द्या, आमची मुले वाट पाहत असतील अशी विनंती केली. मात्र वाहनातून अनधिकृत प्रवासी वाहतूक केली म्हणून दंड भरल्याशिवाय गाडी सोडणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने संतप्त महिलांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊन वाहनधारकांची व पोलिसांची धावपळ झाली. यावेळी देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पवार, तसेच नागरिकांनी पोलीस प्रशासन व मजूर महिलांमध्ये मध्यस्थी करून व महिलांची समजूत घालत त्यांना आंदोलनापासून परावृत्त केले त्यामुळे अर्धा तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.
शेतमजूर महिलांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:49 AM