त्र्यंबकेश्वर : कोण कुठले यात्रेकरू कुटुंब, ३५-३६ वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरला येतात, ब्रह्मगिरी पहाड चढतात आणि त्या कुटुंबातील सर्वांत लहान मुलगी ब्रह्मगिरीवरून पडणारे सृष्टीसौंदर्य न्याहाळत असताना वाऱ्याच्या झोताने कड्यावरून कोसळते. बऱ्याच प्रयत्नांनंतर मुलीचा मृतदेह हाती लागतो. मुलीच्या पार्थिवाजवळ ब्रह्मगिरीवर आलेल्या भाविकांकडून पैशांचा खच पडतो. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आलेले तत्कालीन अर्थ व नियोजनमंत्री रामराव आदिक हेदेखील हजार रुपयांची मदत करतात. मुलीचा मृतदेह घेऊन कुटुंबीय निघून जातात; परंतु त्या मुलीच्या पार्थिवाजवळ जमा झालेल्या पैशांतून उभा राहिला एक ट्रस्ट. याच ट्रस्टच्या माध्यमातून आजही शेकडो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जात आहे. या ट्रस्टचे नाव आहे मनीषा भोयर स्मृती ट्रस्ट.
नागपूर येथील भोयर कुटुंबीयांतील सहा वर्षांची मनीषा हिच्याबाबत ही दुर्घटना घडली होती. त्या वेळी या मुलीच्या शोधमोहिमेसाठी अवघी शासकीय यंत्रणा कामाला लागली होती; परंतु ब्रह्मगिरीच्या खाली असलेल्या काचुर्ली गावातील बांगारे नामक युवकाने हिंमत करत साबरीच्या झाडावर अडकलेल्या मनीषाला हुडकून काढत दरीतून वर आणले होते. त्या वेळी तत्कालीन नगराध्यक्ष व कापड व्यापारी केशवराव उगले यांनी पुढाकार घेत मदतकार्यात मोठे योगदान दिले होते. मनीषाचा मृतदेह शोधून बाहेर काढणाऱ्या बांगारे यांचाही सत्कार करण्यात आला होता. याचवेळी ब्रह्मगिरीवर आलेल्या भाविकांसह शहरातील नागरिकांकडून मुलीच्या मृतदेहाभोवती पैशांचा खच पाडण्यात आला. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आलेले तत्कालीन मंत्री रामराव आदिक यांनीही घटनास्थळी भेट देऊन १ हजार रुपयांची मदत केली होती. मनीषाचे पार्थिव घेऊन कुटुंबीय नागपूरला निघून गेले; परंतु मृतदेहाभोवती जमलेल्या पैशांचे काय करायचे, या पेचात केशवराव उगले सापडले. त्यांनी या पैशांची ठेव ठेवून कै. मनीषा भोयर स्मृती ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टवर मधुकर कडलग, गणेश भुजंग, प्रशांत गायधनी, गिरीश जोशी, ॲड. पराग दीक्षित, प्रशांत गंगापुत्र, ललित लोहगावकर, काशीनाथ अडसरे, सचिन कदम, विजय नाईकवाडी, नितीन मोरे, कै. मनीषा भोयरची मोठी बहीण रूपेश्री भोयर, रत्नाकर जोशी, निखिल भोयर, बाबूराव उगले आदींची नेमणूक करण्यात आली. ट्रस्टची स्थापना करण्यात येऊन दरवर्षी त्या पैशातून गरीब, होतकरू व हुशार आदिवासी दलित मुलांना पुस्तके, वह्या, शालेय साहित्य वाटप मनीषा भोयरच्या स्मृतिदिनाच्या दिवशी केले जाते. अलीकडे शासनानेच शाळेच्या माध्यमातून पुस्तके देणे सुरू केल्याने वह्या, शालेय साहित्याचे वाटप केले जाते. शिवाय गरीब मुलांना बसपास काढून दिले जातात. ट्रस्टने येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कार्यालयात तीन संगणक भेट दिले. मनीषा भोयरला जीव धोक्यात घालून काढणारे बांगारे यांच्या मुलाला म.वि.प्र. संस्थेत कामाला लावण्यात आले. ट्रस्ट आजही अव्याहतपणे आपले काम करत आहे. कोरोनाकाळातही या ट्रस्टने पुढाकार घेत सेवाभावी वृत्तीने काम केले आहे.
इन्फो
ट्रस्टमुळे अनेकांचे जीवन समृद्ध
विशेष म्हणजे ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आपल्या या सेवाकार्याबाबत प्रसिद्धीपासून दूर आहेत. चेतन तथा बाबूराव उगले म्हणतात, आजही ट्रस्टतर्फे देण्यात आलेल्या पुस्तके, वह्या, शालेय साहित्य यावर शिक्षण घेतलेले कुणी शिक्षक, पोलीस, कंडक्टर, वकील, डाॅक्टर झालेले तरुण भेटतात आणि तुम्ही दिलेल्या शालेय साहित्यावर आम्ही शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे असल्याचे सांगतात, तेव्हा मन भरून येत असल्याची भावना उगले व्यक्त करतात.
फोटो- १६ मनीषा भोयर