लोहोणेर : कोरोनाचे पाय लोहोणेर गावात चांगलेच पसरल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन कोरोना नियंत्रण समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शनिवारपासून लोहोणेर गावात कडकडीत जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. यात सर्वच व्यवहार बंदमध्ये सामील झाल्याने लोहोणेर गावात सर्वत्र १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
गावात कोरोनाबधितांची संख्या १०० च्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली असून ही लोहोणेरकराच्या दृष्टीने अत्यंत धोक्याची बाब आहे. कोरोनाची साखळी कुठेतरी तुटावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे गरजेचे होते. याबाबत कोरोना नियंत्रण समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.यात कोरोना साखळी तोडण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करून सर्वांत प्रभावी उपाय म्हणून जनता कर्फ्यू लागू करण्याचे ठरविण्यात आले. याबाबत जनजागृती करण्यात आली.. शनिवारपासून जनता कर्फ्यू कडकडीत बंद पाळण्यास सुरुवात झाली असून तो १९ तारखेपर्यत पाळण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रण समिती व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने केलेल्या आवाहनास १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून, गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.जनता कर्फ्यूच्या बंद काळात नागरिकांनी कोरोना नियंत्रण समिती व ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संबधितांच्या वतीने करण्यात आले आहे.