नाशकात कडक उन्हामुळे रस्ते ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 02:35 PM2018-03-12T14:35:28+5:302018-03-12T15:29:08+5:30
नाशिक: शहरात सर्वत्र कडक उन्हास प्रारंभ झाला असून नागरिकांना सकाळपासूनच उकाडयाचा सामना करावा लागत आहे. दुपारी बारा वाजेनंतर उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत असल्याने शहरातील मुख्य वाहतूक रस्त्यावर वाहतूक मंदावत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसभर वाहनांच्या वर्दळीने फुलणारे रस्ते उन्हामुळे ओस पडत चालल्याने मुख्य रस्त्यावर काहीकाळ शुकशुकाट पसरत आहे. उन्हामुळे नागरिकही घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करीत आहेत तर बाजारपेठेतही ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने बाजारपेठेत दुपारच्या वेळी शांतता पसरत आहे.
दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हामुळे हातगाडीधारक, फेरीवाले देखिल झाडाच्या सावलीचा आधार घेत असल्याचे दिसून येते.
उन्हाळयात ऊसाच्या रसाला मागणी असल्याने ठिकठिकाणच्या भागात ऊस रसाच्या गाड्या रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत तर बस स्थानकाबाहेर रसवंती तसेच लिंबू पाणी, आईस्क्रि म विक्र ेते, बर्फ गोळा, सरबत विक्र ीची दुकाने थाटण्यास प्रारंभ झाला आहे. कामानिमित्ताने घराबाहेर पडणारे नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक डोक्यावर छत्री किंवा हॅट परिधान करून उन्हापासून बचाव करत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात द्राक्षांबरोबरच कलिंगड, टरबुज, आंब्याचेही आगमन होताना दिसते आहे.