माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, ॲड. यतीन वाघ, स्थायी समितीचे माजी सभापती संजय चव्हाण, विद्यमान विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते तसेच विनायक खैरे यांच्यासह काही मोजक्या नेत्यांची बैठक रविवारी (दि. २६) होणार आहे. त्यात गावठाणातील समस्यांवर चर्चा करून आंदोलन करण्यासाठी बैठक होणार आहे.
नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची पाच वर्षे पूर्ण झाली असून आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत स्मार्ट सिटी कंपनीची नाळ नाशिककरांशी जुळलेली नाही. कंपनीचे प्रत्येक प्रकल्प वादग्रस्त ठरत असून ते विश्वासात न घेताच राबवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभादरम्यान अवघा एक किलोमीटरचा स्मार्ट रोड अगोदरच गाजला होता. दीड-दोन वर्षे रखडलेल्या कामांमुळे नागरिक हैराण झाले होते. आता गावठाणातील रस्ते त्यांचे डिझाइन आणि त्याचे होणारे दुष्परिणाम हा वादाचा विषय ठरला आहे. गावठाण विकास प्रकल्पांतर्गत रस्ते, जलवाहिनी आणि गटारांची कामे करण्यात येणार असून त्यातील रस्त्यांची कामे करताना चुकीचे डिझाइन केल्याने रस्ता खोल करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराच्या वरील भागांतील पाणी सराफ बाजारात जाणार नाही, मात्र अन्य भागात पूरस्थिती निर्माण होईल, अशी तक्रार आहे. त्यातच अनेक ठिकाणी संथगतीने काम सुरू असून त्यामुळे दररोज व्यापारी, ग्राहक आणि वाहनचालकांना अडचणी येत आहेत. आता दसरा, दिवाळी येत असून अशावेळी गावातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी असते. मात्र, अशा खोदकामांमुळे अडचण येणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या याच विषयावर आणि अन्य अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येणार असून कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
इन्फो...
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सध्या गोेदालगत लावण्यात आलेल्या फरशा वाहून जात असून नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामातही गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत. मेकॅनिकल गेटचे कामदेखील अर्धवट आहे, अशा अनेक कामांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.