सत्तासंघर्षात २८९ व्या आमदाराची ‘अशीही’ सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:12 AM2019-11-30T01:12:45+5:302019-11-30T01:13:49+5:30
गेल्या सव्वा महिन्यापासून राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पडदा पडला आणि विधानसभेवर निवडून गेलेल्या २८८ आमदारांसह जनतेनेही दीर्घ सुस्कारा सोडला. राजकीय अनिश्चिततेच्या याच कालावधीत सिन्नर तालुक्याच्या पंचक्रोशीत लोकांच्या मनातील २८९ वे आमदार म्हणून परिचित असलेल्या जायगाव येथील महादू सखाराम गिते या ज्येष्ठाचीही महिनाभर सुरू असलेल्या टोमण्यांपासून सुटका झाली आणि त्यांचा हा आनंद ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केला.
दत्ता दिघोळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : गेल्या सव्वा महिन्यापासून राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पडदा पडला आणि विधानसभेवर निवडून गेलेल्या २८८ आमदारांसह जनतेनेही दीर्घ सुस्कारा सोडला. राजकीय अनिश्चिततेच्या याच कालावधीत सिन्नर तालुक्याच्या पंचक्रोशीत लोकांच्या मनातील २८९ वे आमदार म्हणून परिचित असलेल्या जायगाव येथील महादू सखाराम गिते या ज्येष्ठाचीही महिनाभर सुरू असलेल्या टोमण्यांपासून सुटका झाली आणि त्यांचा हा आनंद ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केला.
गावकीचे राजकारण हे जसे सुडाचे तसेच ते मनोरंजनानेही भरलेले असते. गावातील पारावर रंगणाऱ्या गप्पांच्या फडात राजकारण हा प्रमुख विषय असतो. गावामधील काही लोक हे चेष्टेचाही विषय बनत असतात. गावातील इरसालपणाच्या गोष्टी रंजक असतात. असाच रंजकतेचा नमुना जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पहायला मिळाला. तालुक्यातील जायगाव येथील महादू गिते या ज्येष्ठ नागरिकाचे शिक्षण जेमतेम असले तरी राजकारणाच्या इतिहास-भूगोलात त्यांचे ज्ञान एखाद्या राजकीय तज्ज्ञ विश्लेषकापुढेही फिके पडावे असे आहे. म्हणून महादू गिते हे पंचक्रोशीत ‘आमदार’ या टोपण नावानेच परिचित आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या सव्वा महिन्यापासून सत्तेसाठी नाट्य सुरू होते. रोजच्या घटना-घडामोडी, सरकार स्थापनेला होणारा विलंब, संजय राऊत यांची रोजची पत्रकार परिषद, आमदारांची पळवापळवी यापासून ते कोण होणार मुख्यमंत्री, यापर्यंतच्या चर्चांना उधाण आले असताना त्यासंबंधीची विचारणा ग्रामस्थांकडून महादू गिते यांनाच केली जायची. महादू गिते दिवसभर जेथे जातील तेथे त्यांना काय आमदार, आज कुणाला पाठिंबा देणार, तुम्हाला कुणी पळवून नेले नाही का, असा प्रश्नांचा भडिमार करत ग्रामस्थ त्यांना भंडावून सोडत असत. महादू गितेही सुरुवातीला या टोमण्यांमुळे गमतीने घेत त्यांची उत्तरे द्यायचे. परंतु जसाजसा सत्तास्थापनेला विलंब होत गेला तशी त्यांची उत्तरे देताना तारांबळ उडायला लागली. अखेर गुरुवारी (दि.२८) मुंबईत शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा साºया महाराष्टÑाने जसा सुटकेचा नि:श्वास सोडला त्याहून अधिक दीर्घ सुस्कारा जायगावमधील गावकऱ्यांचे आमदार महादू गिते यांनी टाकला. महिनाभराच्या सत्तासंघर्षात टोमण्यांपासून सुटका झाल्याने महादू गिते यांना आनंद झाला आणि सत्तानाट्यावर पडदा पडल्याने ग्रामस्थांनीही त्यांच्या आनंदात सहभागी होत ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र जमत राज्यातल्या या अघोषित २८९ व्या आमदाराचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.