शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 02:06 AM2019-08-12T02:06:25+5:302019-08-12T02:06:40+5:30
शेततळ्याचे पाणी बघायला गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरून बुडून अंत झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळदर येथे रविवारी घडली.
सटाणा : शेततळ्याचे पाणी बघायला गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरून बुडून अंत झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळदर येथे रविवारी घडली.
पिंपळदर येथील दिनेश केदा सोळंके (१५) हा नववीत शिकणारा मुलगा सुटी असल्यामुळे लहान भावासह शिवारात गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दिनेश याने संदीप राजपूत यांनी नव्याने तयार केलेल्या शेततळ्याचे पाणी बघून येऊ, असे लहान भावाला सांगितले; मात्र शेततळ्याला जाळीचे कुंपण असल्यामुळे जाता येत नव्हते. म्हणून दिनेशने लहान भावाला बाजूला थांबवून तो जाळीवरून उडी मारून शेततळ्यातील पाणी बघण्यास गेला.
पावसामुळे पाय घसरून तो पाण्यात बुडाला .यावेळी लहान भावाने आरडाओरडा केला असता मदतीला कोणीही नव्हते. त्यामुळे तो वडिलांना शेतात बोलाविण्यास गेला .वडीलांना पोहता येत नसल्याने गावातीलच दोन युवकांना त्यांनी सोबत घेतले.परंतु तोपर्यंत दिनेशचा बुडून मृत्यू झाला होता. सरपंच संदीप पवार ,संदीप राजपूत ,नितीन बागुल यांच्यासह गावकऱ्यांच्या मदतीने शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
दरम्यान सटाणा ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा पिंपळदर येथे शोकाकुल वातावरणात दिनेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले .या घटनेची नोंद सटाणा पोलिसात करण्यात आली आहे .
फोटो : ११ दिनेश सोळंके