सरकारचा शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा घाट असल्याचा छात्रभारतीचा आरोप, शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची होळी करून नोंदवला शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:29 PM2017-12-04T16:29:39+5:302017-12-04T16:36:46+5:30
नाशिक : शिक्षणात महाराष्ट्र प्रगत झाल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने, कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल 1314 शाळा बंद करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शासकीय शाळा बंद करून शिक्षणाचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सोमवारी (दि.4) सीबीएस जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या अध्यादेशाची होळी करून सरकारचा निषेध नोंदवला आहे.
शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नजीकच्या अन्य सरकारी वा खासगी शाळेत सामावून घेण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले असून, राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग करणारा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. खासगी शाळांमधील दहा हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदांच्या शाळेत प्रवेश घेतल्याचे सांगणाऱ्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील पटसंख्या खालावल्याचे आणि गुणवत्ता कमी झाल्याचे कारण पुढे करत शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या या निर्णयाने शिक्षण क्षेत्रत खळबळ उडाली आहे. त्यामुळे छात्रभारतीने आक्रमक भूमिका घेत सोमवारी आंदोलन केले. तसेच शिक्षण विभागाने घेतलेल्या पेपर फुटण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी परीक्षेच्या निश्चित वेळेनंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्याच्या निर्णयाचाही निषेध करण्यात आला. विविध शालेय व बोर्डाच्या परीक्षांसह स्पर्धा परीक्षांसाठी दुर्गम व ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी येतात. त्यांना प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने अनेकदा उशीर होतो. त्याचप्रमाणो शहरातील विद्यार्थ्यांनाही अनेकदा वाहतूक कोंडीमुळे तसेच विविध कारणांनी परीक्षेला वेळेत पोहचता येत नाही. मात्र शासनाच्या अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीबरोबरच मानसिक त्रसाचाही सामना करावा लागणार असल्याचे सांगत छात्रभारतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गरीब व सर्वसामान्यांच्या विरोधातील शैक्षणिक धोरण राबविण्याचा आरोप केला असून, सरकारने राज्यातील 1314 शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा तसेच परीक्षांसदर्भात घेतलेला निर्णयाचाही पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. या आंदोलनात छात्रभारतीचे माजी अध्यक्ष समाधान बागुल, राम सूर्यवंशी, शहराध्यक्ष राकेश पवार, जिल्हाध्यक्ष सागर निकम, विशाल रनमाळे, आम्रपाली वाकळे, देवीदास, कोमल गांगुर्डे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.