नाशिक : अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना त्रिमूर्ती चौकात गुरुवारी घडली. विशाल संतोष नागोरी (१९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल डिप्लोमाच्या वर्गात शिकत होता. सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट येथे राहणारा विशाल नागोरी हा एका अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता. परीक्षेत सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे विशाल काहीसा नैराश्यामध्ये असल्याची बाब चौकशीत समोर आली. या नैराश्यातूनच गुरुवार, दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास त्याने घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. परीक्षेत काही विषयांत सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे विशालवर परीक्षेचे काहीसे दडपण आले होते. त्याला एक वर्षाचा ड्रॉपआॅफ (वायडी) बसला होता. त्यामुळे तो बाहेरून परीक्षा देणार होता.
नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:36 AM