चांदोरी : जास्तीच्या पावसामुळे उसाची लागवड वाढू शकते असा अंदाज या क्षेत्रातील जाणकरांनी व्यक्त केला आहे.मागील वर्षी असलेल्या पाणीटंचाईमुळे उसाचे उत्पादन घटले, तर काही उसाच्या शेतात अजून पाणी साचून आहे. यामुळे यंदा १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता कमी आहे. निफाड तालुक्यातील रानवड व भाऊसाहेबनगर (पिंपळस) हे दोन कारखाने बंद असल्याने दिंडोरी तसेच अहमदनगर व कोपरगाव या कारखान्यांना नाशिक जिल्ह्यातील गोदकाठचा ऊस उपलब्ध होत असतो.यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे शेतीची मशागत करायलाच अवधी लागला व त्यानंतर उसाची लागवड केली जाऊ शकते. तसेच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षबाग, सोयाबीन, मका, भात या पिकांचे नुकसान झाले आहे. आर्थिक तग धरण्यासाठी शेतकरी उसाचे उत्पादन घेण्याची शक्यता आहे.येणाऱ्या हंगामात राज्यातील यापूर्वी हंगाम घेतलेल्या १९५ कारखान्यांपैकी किमान ५० कारखाने बंद राहतील. उरलेल्या कारखान्यांना त्यांच्या क्षमतेएवढा ऊस मिळणार नाही.यावर्षी साखरेचे उत्पादन ५५ लाख टनापर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जागतिक स्तरावर गेल्या वर्षातील अतिरिक्त साखर उत्पादननानंतर यंदा उत्पादन ६० ते ६५ लाख टनांनी घटणार आहे. अशा परिस्थितीत साखरेची मागणी कायम राहणार असून, पुरवठा अपुरा राहणार आहे. त्यामुळे भारताला निर्यातीची संधी अधिक आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.अतिवृष्टीमुळे द्राक्षबाग व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक झळ सोसावी लागली असल्याने कमी खर्चिक असणारे पीक शेतकरी घेतील, असा अंदाज आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:53 PM