तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील पठावे येथे प्रेमीयुगुलाने आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२४) उघडकीस आली. रवींद्र पोपट पवार (२२) व सावरगाव येथील पूजा बंडू गांगुर्डे (१८) अशी मयतांची नावे आहेत. रवींद्र या तरुणास हळदीच्याच दिवशी अग्निडाग देण्याचा दुर्दैवी प्रसंग पित्यावर आला.रवींद्रच्या घरी लग्नाची धामधूम सुरू होती. त्याच्या हळदीसाठी व मांडवासाठी आंब्याचे डहाळे तोडायला गेलेल्या मंडळींनी दोघांचे मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेले पाहिले. ही माहिती रवींद्रच्या वडिलांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. घरात लग्नाच्या निमित्ताने मंगलमय वातावरण असताना क्षणार्धात सर्वत्र स्मशानशांतता पसरली.पोलीसपाटील दयाराम पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून सटाणा पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून खबर दिली. पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, हवालदार प्रकाश जाधव, पोलीस नाईक जयंतसिंग सोळंके आदी घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे पार्थिव झाडावरून उतरवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश जाधव करत आहेत.मागील काही वर्षांपासून पठावे दिगर परिसरात प्रेमीयुगुलांच्या आत्महत्या घडत आहेत. यामुळे परिसराची बदनामी होत आहे. पोलीस यंत्रणेमार्फत तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत या घटनांना आळा घालण्यासाठी परिवर्तनाचे उपक्रम राबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रवींद्र हा माझा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासून लाडाकोडात वाढवला. कटकसरीने संसाराचा गाडा ओढत त्याच्या हौसेप्रमाणे त्याच्यासाठी घर, कांद्याच्या चाळी, वेल्डिंगचे मशीन, बागायत शेती उभी केली. भलामोठा कर्जाचा डोंगर असल्यामुळे आम्ही पती-पत्नी रात्रंदिवस शेतात राबत होतो. रवींद्रही कष्टाळू होता. त्याचे दोनाचे चार झाले की आम्ही एका जबाबदारीतून मुक्त होऊ असे वाटत होते. पण नियतीच्या मनात काय दडले होते कुणास ठाऊक? त्याचे हळदीने अंग पिवळे करण्याअगोदरच त्याला अग्निडाग देण्याची दुर्दैवी वेळ आली.- पोपट पवार, (रवींद्रचे वडील)