परिसरात असणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत आमदार माणिकराव कोकाटे यांनी सूचना केल्या होत्या. मागील पावसाळ्यात भोजापूर धरण पुरेशा क्षमतेने भरले होते. रब्बी हंगामासाठी १० फेब्रुवारी रोजी आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, पावसाच्या पाण्याने विहिरींची पातळी उंचावलेली असल्याने शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची पुरेशी मागणी झाली नाही. त्यामुळे धरणात १२० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. शिल्लक पाण्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजनांना उन्हाळी आवर्तन सोडून त्यातून या योजनांचे बंधारे व कालव्यालगत असलेले पाझर तलाव, बंधारे भरून द्यावेत, अशा सूचना आमदार कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. भोजापूर धरणात असलेल्या १२० दशलक्ष घनफूट पाण्यातून मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावांना जुलैअखेर पुरेल इतके सुमारे ३२ दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. ४० दशलक्ष घनफूट पाण्यातून दोडी व नांदूरशिंगोटे परिसरातील व संगमनेर तालुक्यातील निमोणसह पाच गावांना कालव्यालगत असलेल्या बंधारे, पाझर तलाव भरून देण्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ४५ ते ५० दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन व गळती होऊ शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. सिन्नर तालुक्यातील दोन पाणी योजनांना पुरेल इतके पाणी या आवर्तनातून देण्यात येणार असल्याने योजनेवर आधारित २१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. ३२ दशलक्ष घनफूट पाणी दोन योजनांना मिळणार असून, ४० दशलक्ष घनफूट पाणी बंधारे व पाझर तलावांना मिळणार आहेत. दरम्यान, भोजापूरचे आवर्तन सोडण्यासाठी पंचायत समिती सभापती शोभा बर्के यांनीही मागणी केली होती.
कोट....
मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे पाणीपुरवठा योजनांना पाणी देण्याबरोबरच शक्य तेवढे पाझर तलाव, बंधारे भोजापूरच्या आवर्तनाने भरून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, ही आपली भूमिका असून, त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- माणिकराव कोकाटे, आमदार