मार्चअखेर पु्न्हा सुर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिले असून येणाऱ्या एप्रिल महिन्यातील प्रखर उन्हाची जाणीव नाशिककरांना शनिवारपासूनच होण्यास सुरुवात झाली. कमाल तापमानाचा पारा ३८ अंशाच्याही पुढे सरकल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान चाळीशी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक वाढणार असल्याने नाशिककरांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. एकीकडे बदलते ऋुतुमान अन हवामानामुळे आरोग्यावर होणारा परिणाम तर दुसरीकडे पुन्हा मागील वर्षाप्रमाणेच गडद झालेले कोरोना आजाराचे संकट अशा दुहेरी धोक्याचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे.
शनिवारी सकाळपासूनच ऊन तापण्यास सुरुवात झाली होती. जसाजसा दिवस पुढे सरकत गेला तशी उन्हाची तीव्रता अधिकच वाढू लागल्याचा अनुभव नाशिककरांना आला. दिवसभर नागरिकांना पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रांचा आधार घ्यावा लागला. वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत हाेता. संध्याकाळीसुध्दा नागरिकांना वातावरणात उकाडा जाणवत होता, कारण किमान तापमानदेखील १६ अंशावर पोहचले होते. यामुळे नाशिककरांना रात्रीचा उकाडाही असह्य होत होता.