पूर्व भागातील गावांना विहिरींचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:02 PM2020-05-23T21:02:32+5:302020-05-24T00:30:52+5:30
देवळा (संजय देवरे) तालुक्याची भौगोलिकस्थिती पाहता उत्तरेकडे गिरणा नदीचा काठ मध्ये गिरणा उजवा कालवा व दक्षिणेला चणकापूर उजवा कालवा असे पूर्व-पश्चिम तीन भाग पडतात. बहुतांश पाणी योजना गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गिरणा नदीला व उजव्या कालव्याला येणाऱ्या आवर्तनावर तालुक्याचा बहुतांश भाग अवलंबून आहे.
देवळा (संजय देवरे) तालुक्याची भौगोलिकस्थिती पाहता उत्तरेकडे गिरणा नदीचा काठ मध्ये गिरणा उजवा कालवा व दक्षिणेला चणकापूर उजवा कालवा असे पूर्व-पश्चिम तीन भाग पडतात. बहुतांश पाणी योजना गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गिरणा नदीला व उजव्या कालव्याला येणाऱ्या आवर्तनावर तालुक्याचा बहुतांश भाग अवलंबून आहे. दरम्यान, तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांना धरणे कोरडी पडल्यामुळे अधिग्रहित केलेल्या विहिरींनी आधार दिलेला आहे.
तालुक्यात उमराणे येथील परसूल धरण तसेच रामेश्वर येथील किशोरसागर धरणात सध्या पाण्याचा साठा असल्याने या धरणातील नळ पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू आहेत. चणकापूर उजव्या कालव्याला व त्याच्या वितरिकांना नुकतेच चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाºया गावांतील पाणीटंचाई दूर झाली आहे. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची धग जाणवत नाही.
देवळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खर्डा, कनकापूर, शेरी, वार्शी, मुलूकवाडी, कांचणे, हनुमंतपाडा आदी गावांना चणकापूर उजव्या कालव्याचा कोणताही लाभ होत नाही. त्या भागात असलेले वार्शी व कनकापूर धरण कोरडे पडले आहे.
देवळा शहरासाठी गिरणा नदीपात्रातून सामुदायिक पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या देवळा, सरस्वतीवाडी, माळवाडी, फुले माळवाडी, विजयनगर, खुंटेवाडी, श्रीरामपूर, खालप या गावांना गिरणा नदीला आवर्तन सोडले जाते, त्यावेळी पाणीपुरवठा सुरळीत असतो. गिरणे ला सोडण्यात येणाºया आवर्तनावर ही योजना अवलंबून आहे. आवर्तन बंद झाले की योजना ठप्प होते व शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गिरणा नदीला सोडण्यात येणाºया आवर्तनांच्या मधील काळात नदीपात्रातील उद्भव विहिरी आटल्यानंतर नगरपंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. त्या काळात लोहोणेर येथील बापू अहिरराव, देवीदास धामणे, अशोक धामणे, प्रल्हाद बागुल आदी शेतकरी त्यांच्या विहिरीतील व बोअरवेलचे पाणी देऊन सहकार्य करत असल्यामुळे टंचाई काळातही शहराला पाणीपुरवठा सुरू आहे.
----------
कोरोनामुळे योजना खोळंबली
रामेश्वर धरणातून महाराष्ट्र नगरोत्थान अभियानातून देवळा शहरासाठी साडेनऊ कोटी रुपयांच्या थेट पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना पूर्ण झाल्यास देवळा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रामेश्वर धरणात पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण होऊन वर्षभर वेळोवेळी पाण्याचे नियमित आवर्तन मिळेल. त्यामुळे धरण व कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना व वरवंडी, मटाणे, वाजगाव, रामेश्वर आदी गावांनादेखील याचा लाभ होऊन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही; परंतु कोरोना महामारीमुळे योजना खोळंबली असल्याची माहिती नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर यांनी दिली.