मनमाड : अस्तगाव येथील जवान सुरेश रघुनाथ घुगे यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १४) दुपारी शोकाकुल वातावरणात व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ह्यसुरेश घुगे अमर रहेह्ण च्या घोषणा देत गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी अखेरची मानवंदना दिली.
घुगे हे २४ मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. जम्मूच्या नौसेरा या सीमावर्ती नियंत्रण रेषेवर रात्री गस्त घालत असताना ते उंच डोंगरावरून खाली घसरून पडले होते. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या सेवापूर्तीला अवघी काही वर्षे शिल्लक होती. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी व नऊ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. फुलांनी सजवलेल्या विशेष वाहनाने अंत्ययात्रा काढण्यात आली.
गावाजवळील शेतातील पटांगणात आल्यानंतर लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली. सुभेदार संदीप कुंभार यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, माजी सैनिक, लष्करी अधिकारी, महसूल व इतर शासकीय अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर घुगे यांच्या पार्थिवाला लपेटलेला तिरंगी ध्वज काढून लष्करी अधिकाऱ्यांनी तो जवान घुगे यांची पत्नी धारित्री यांच्याकडे सुपूर्द करताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले. कन्या आराध्या हिने आपल्या पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच उपस्थितांचे डोळे पाणावले होते.