अहो आश्चर्यम, जुळ्या भावंडांना मार्कही मिळाले जुळे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:13 PM2020-08-01T23:13:37+5:302020-08-02T01:28:42+5:30
नाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशकातील जुळ्यांना मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहेत. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशकातील जुळ्यांना मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहेत. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.
जुळ्यांच्या चेहऱ्यांबरोबरच स्वभावही सारखे असतात. त्यातून अनेक रंजक घटनादेखील घडतात. नाशिकमध्ये मात्र अत्यंत दुर्मीळ घटना घडली आहे. शहरातील बॉइज टाउन शाळेत जाणारे ओम आणि शिवानी बिरारी हे जुळे भावंडे. त्यांना दहावीच्या परीक्षेत ८२.२० टक्के गुण मिळाले असल्याने साऱ्यांनाच या घटनेमुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. दहावीच्या परीक्षेत या दोघांना प्रत्येक विषयात मिळालेले गुण कमी-अधिक असले तरी दोघांच्या गुणांची बेरीज मात्र ५०० पैकी ४४१ इतकीच येत असल्यामुळे दोघांना एकूण ८२.२० टक्के गुणच मिळाले आहेत.
जुळ्या मुला-मुलींच्या बाबतीत अशाप्रकारे मार्कही जुळेच असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ओम आणि शिवानी यांचा जन्म १ मे २००४ रोजीचा. दोघेही अभ्यासात हुशार. अर्थात, ते जुळे भावंडं असले तरी एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. खाणे-पिणे, मनोरंजनाचा अभ्यास हे सर्वच वेगळे आहे. अभ्यासातही ओमला गणित, तर शिवानीला जीवशास्रासारखा विषय आवडतो. परंतु दोघांचे गुण मात्र ८५ ते ९० टक्केच असतात. हे मात्र नक्की. यंदा मात्र दहावीच्या विषयाला दोघांनी वेगळाच विक्रम नोंदवला. यासंदर्भात त्यांचे वडील सुनील बिरारी सांगतात की, जुळे भावंडं असले तरी त्यांच्या आवडी-निवडी फार सारख्या नाहीत. त्यांची उंचीदेखील वेगळी आहे. मात्र, दोघेही अभ्यासू आहेत. त्यामुळे त्यांना विविध विषयांत मिळणारे गुण आणि टक्केवारी यात फार फरक नाही, असेही त्यांनी सांगितले. सुनील बिरारी हे मूळचे कळवण तालुक्यातील पाष्टे येथील रहिवासी आहेत.
दोघा जुळ्या भावडांना एकसारखे गुण मिळाल्याचे उदाहरण दुर्मिळ आहे. मात्र दोन्ही भावंडांची वेगवेगळ्या विषयात रुची आहे. ओमला संरक्षण क्षेत्रात जायचे असून, शिवानीला मात्र वैद्यकीय क्षेत्राकडे कले आहे.