लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : इगतपुरी तालुक्यातील खडाडवाडी येथे स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेला, परंतु ग्रामस्थांनी तक्रार केलेल्या बहुचर्चित तेरा लाखांच्या रस्त्याची बुधवारी तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करण्यात आली. सदरचा रस्ता ज्या ठिकाणी मंजूर करण्यात आला तेथे तो जागेवर नसल्याची बाब यावेळी उघडकीस आली, शिवाय मंजूर रस्ता एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकाच्या शेताकडे जात असल्याची गोष्ट ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली. खडाडवाडी येथे मंजूर झालेल्या रस्त्याचे काम ज्या ठिकाणी मंजूर झाले त्याठिकाणी करण्यात आला नसल्याची तक्रार ग्रामपंचायतीने यापूर्वीच केली असता, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी मात्र रस्ता जागेवरच असल्याचा दावा केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या रस्त्याच्या चौकशीसाठी श्रमजीवी संघटनेने इगतपुरी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केल्याने सदर रस्त्याच्या शोधासाठी प्रत्यक्ष तहसीदार अनिल पुरे यांनी गावाला भेट देण्याचे निश्चित केले. त्यानुसार बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे व्ही. के. आव्हाड यांच्यासह त्यांनी धारगाव पाट ते खडाडवाडी मंजूर असलेल्या रस्त्याची प्रत्यक्षात पाहणी केली असता ज्या ठिकाणासाठी रस्ता मंजूर झाला त्याठिकाणी तो नसल्याचे आढळून आले. रस्ता बांधला नसतानाही तो बांधल्याची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, रस्त्यावर झालेल्या खर्चाची वसुली त्यांच्या वेतनातून करण्यात यावी व ज्या ठिकाणी रस्ता मंजूर आहे त्या ठिकाणी रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. येत्या आठ दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ आत्मदहन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती उलट धारगाव पाट ते खडाडवाडी हा रस्ता तालुक्यातीलच एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकाच्या फार्महाउसपर्यंत बांधण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी तहसीलदार पुरे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याने त्यांनी या दौऱ्यातून काढता पाय घेतला.
खडाडवाडीच्या रस्त्याची तहसीलदारांकडून पाहणी
By admin | Published: July 06, 2017 12:07 AM