नाशिक- सध्या छोट्या पडद्यावर चाललेल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट करताना राजे संभाजी यांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवू नका अशी मागणी होत आहे, मात्र राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी मात्र हा इतिहास दाखवायलाच हवा असं नाशिकमध्ये सांगितले.
राजे संभाजी यांच्या अटकेनंतर त्यांचे हाल झाले. त्यामुळे अटकेनंतरचे दृष्ट दाखवू नये अशाप्रकारची एक मागणी आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी तर ही मागणी लावून धरली आाहे. मात्र, नाशिकमध्ये राणू अक्का म्हणजे महांगडे यांनी या मागणीला प्रत्युत्तर दिलंय.
खोतकर यांच्या विषयी आणि त्यांच्या मागणीविषयी आदर आहे. मात्र, आत्ताच्या पिढीला आणि लहान मुलांनाही संभाजी राजांनी काय सोसलंय ते कळायला हवं असे त्या म्हणाल्या. अर्थात, इतिहासातील लिखाणानुसार जसे आहे तसे न दाखवले जाणार नाही. विशेष म्हणजे मालिकेत कोठेही रक्तही दाखवले जाणार नाही, याबाबत विशेष काळजी घेतली जाईल असे त्यांनी नमुद केले आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे आज नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यांच्या हस्ते नाशिक महापालिकेच्या पुष्पप्रदर्शनाचे उदघाटन देखील करण्यात आले. राणू आक्काच्या वेशातच आलेल्या महांगडे यांचे नाशिककरांनी जोरदार स्वागत केले. राणू आक्कांनीही मग व्यासपीठावर मालिकेतील खणखणीत संवाद सादर केला आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी असा जयघोष करून समारोप केला असताना त्यांना टाळ्यांच्या कडाकडाटात दाद मिळाली.