उपचार न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्याचा रुग्णालयासमोर रिक्षामध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:09+5:302021-05-11T04:16:09+5:30
महापालिकेने या प्रकरणाची दखल घेतली नाही की, कोणत्या रुग्णालयाला नेाटीस दिलेली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार त्या कामगाराला कोरोना संसर्ग ...
महापालिकेने या प्रकरणाची दखल घेतली नाही की, कोणत्या रुग्णालयाला नेाटीस दिलेली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार त्या कामगाराला कोरोना संसर्ग झालेला नव्हता, तसेच त्याचा अहवाल या आधीच निगेटिव्ह आला होता, असे सांगण्यात आले.
सिडकोतील उदय कॉलनी येथील रहिवासी नंदू सोनवणे हे महापालिकेत सफाई कामगार असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कॅन्सरवर उपचार सुरू असल्याने ते रजेवर होते, तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी मनपाच्या बिटको रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहे. यादरम्यान रविवारी (दि.९) पहाटे नंदू सोनवणे यांना अस्वस्थ वाटत होते. यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना परिसरातील सामजिक कार्यकर्ते रिक्षाचालक भगवान मराठे हे सोनवणे यांच्यासह मुलीला रिक्षात घेऊन लेखानगर येथील खाजगी रुग्णालयात गेले. आमच्या रुग्णालयात बेड नसल्याने तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा, असे जवळपासच्या तीनही रुग्णालयांतील डॉक्टरांनी सांगितले. यानंतर रुग्णाला खूपच त्रास जाणवू लागल्याने रिक्षाचालक मराठे व रुग्णाची मुलगी यांनी डॉक्टरांना विनवण्या करून हातपाया पडून रुग्णास उपचारासाठी दाखल करून घेण्याचा आग्रह केला. मात्र, उपयोग झाला नाही. अखेर, रुग्णाने लेखनावर येथील रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच रिक्षात आपले प्राण सोडले. आपल्या डोळ्यांसमोर वडिलांनी प्राण सोडल्याने मुलीला अश्रू अनावर झाले. यानंतर रिक्षाचालक मराठे हे जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर रुग्णाची कोरोना चाचणी केली असता चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.
कोट...
ज्या-ज्या रुग्णालयात उपचारासाठी नेले, त्यातील एकाही रुग्णालयाने तपासलेदेखील नाही. त्यामुळे माझ्या वडिलांचा माझ्या डोळ्यांदेखत मृत्यू झाला. आयुष्यभर मला याची खंत राहील.
- माया केदारे, मृत रुग्णाची मुलगी