नाशिक : आमरस, मांडा, सांजोरी, पुरी, भाजीच्या साग्रसंगीत भोजन आस्वादाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची गोडी वाढविली. खान्देशात आखाजी म्हणून साजरी होणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला माहेरवाशिणी माहेरी येण्याची परंपरा असली, तरी यंदा लॉकडाऊनमुळे सर्व गृहिणींना सासरीच राहून अक्षय तृतीया साजरी करावी लागली. आखाजीनिमित्त बहुतांश घरांमध्ये करा-केळीचे पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र, निर्बंधांमुळे अनेकांना करा-केळीचे लहान माठ आणणे शक्य न झाल्याने, गृहिणींनी घरातील कलशात पाणी भरून पूजन केले, तसेच या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी आपापल्या प्रियजनांना व्हॉट्सॲपवर शुभेच्छांचे आदानप्रदान केले. सलग दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीया केवळ घरांमध्येच साजरी झाली. पुरातन संस्कृत ग्रंथातील संदर्भानुसार हा परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता वाढते. या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो. या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते. म्हणून या दिवशी अन्नदानासह अन्य दानधर्म करण्याचीही परंपरा आहे. मात्र, यंदाही निर्बंधामुळे नागरिकांना ते शक्य झाले नाही. मात्र, यंदाही आपत्धर्म म्हणून अनेक निर्बंध असल्यामुळे अक्षय तृतीयेचा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा आल्या. पुन्हा झोक्यांविना आखाजीपूर्वापार गावागावांमध्ये नदीकाठी मुली जमून झिम्मा, फुगडी खेळणे, नाच, गाणी म्हणण्याची प्रथा असली, तरी महानगराच्या परीघातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असल्याने, परिसरात कुठेही पारंपरिक पद्धतीने ही नाच, गाणी, झोक्यांचा खेळ रंगू शकला नाही. सण असूनही निर्बंधांमुळे कुणाला माहेरपणंच न मिळाल्याने बहुतांश गावांमध्ये झोकेच बांधले गेले नाहीत, तरीही नागरिकांनी त्यांच्या परीने घरच्या घरी सण साजरा करीत संकटकाळातही आनंदाचे क्षण शोधले.
अक्षय्य तृतीयेच्या सणाला मधुर आमरसाची गोडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:42 AM
आमरस, मांडा, सांजोरी, पुरी, भाजीच्या साग्रसंगीत भोजन आस्वादाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची गोडी वाढविली. खान्देशात आखाजी म्हणून साजरी होणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला माहेरवाशिणी माहेरी येण्याची परंपरा असली, तरी यंदा लॉकडाऊनमुळे सर्व गृहिणींना सासरीच राहून अक्षय तृतीया साजरी करावी लागली.
ठळक मुद्देलॉकडाऊनचे संकट : कोरोनाच्या सावटातही पारंपरिक पद्धतीने घरातच सण साजरा