टाकेदला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 07:05 PM2021-02-09T19:05:26+5:302021-02-09T19:06:10+5:30
सर्वतिर्थ टाकेद : प्रभु रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या व सर्वतीर्थाचे माहेर घर असलेल्या टाकेद येथे आयोजित ५२ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली.
सर्वतिर्थ टाकेद : प्रभु रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या व सर्वतीर्थाचे माहेर घर असलेल्या टाकेद येथे आयोजित ५२ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली.
गावातील प्रेमनगर, इंदिरानगर, तेली गल्ली, धादवड गल्ली, परदेशी गल्ली, शनी मंदिर चौक या परिसरातून दिंडी काढण्यात आली होती. टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाच्या जयघोषात अवघे टाकेद ग्रामस्थ तल्लीन झाले होते. कोणी फुगडी खेळत, तर कोणी हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत नाचत होते.
या दिंडीने गाव प्रदक्षिणा सुरुवात होताच महिलांनी रस्त्यावर प्रत्येक दारासमोर सडा, रांगोळी काढत ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत केले. या दिंडीत महिला, ज्ञानेश्वरी पारायण, तुळशी वृंदावन, बाळ गोपाळ यांच्यासह भाविक, वारकरी ग्रामस्थ सामील होते.
गाव प्रदक्षिणा पूर्ण होताच मारुती मंदिर चौकात या सप्ताहाच्या मुख्य ठिकाणी आल्यानंतर या चौकात दरवर्षी प्रमाणे मोठे रिंगण करण्यात आले. या रिंगणात टाकेद येथील जेष्ठ प्रवचनकार प्रकाश महाराज कदम यांनी महिलेचे रूप धारण करून महिलेची वेशभूषा परिधान करून 'आईचा जोगवा मागेन' हे मनोरंजक हास्यमय भारुड सादर केले. त्यानंतर सत्वर पाव ग मला भवानी आई, खेळू फुगडी बाई, खेळू भवरा बाई, नवरा नको ग बाई ही भारुडं झाली. व टाळ मृदंगाच्या तालावर हा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
दिंडी भारुड कार्यक्रमानंतर दही हंडी कार्यक्रम झाला. यानंतर या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची महाप्रसाद महापंगत भास्कर जाधव व गोविंद जाधव यांनी दिली. तब्बल सात दिवस ज्ञानेश्वरी महिला पारायण व आठ दिवस, दिवस रात्र विणा पूजा अर्चा सेवा अखंडित चालू होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी टाकेद सह बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडी सह परिसरातील विविध गाव, वाड्या वस्त्यांमधून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत हा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला.