मऱ्हळ येथे देवाची बोळवण करीत यात्रेची सांगता
By Admin | Published: February 15, 2017 11:13 PM2017-02-15T23:13:19+5:302017-02-15T23:14:50+5:30
प्रतिजेजुरीचा उत्सव : लाखभर भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मऱ्हळ येथील प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा महाराज यात्रोत्सवाची मंगळवारी उत्साहात सांगता झाली. ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ च्या जयघोषात हातात दिवटी व बुधली घेऊन भंडारा अन् खोबऱ्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाल बागेतून खंडेरायाची बोळवण करण्यात आली. राज्यातील सुमारे लाखभर भाविकांनी लाडक्या देवाचे दर्शन घेतले.
पांगरी येथून शनिवारी रथ आल्यानंतर यात्रोत्सव सुरूझाला होता. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेला रथ वाजत गाजत मंदिरासमोर आल्यावर खंडेराव महाराजांच्या पालखी व मूर्तीची परीट समाजातील सगर कुटुंबीयांनी अनंत योगाच्या देव्हाऱ्याची विधिवत पूजा केली. देवाच्या आरतीनंतर रथाच्या दर्शनासाठी यात्रेकरुंची गर्दी झाली होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. शनिवारी रात्री रथ व खंडेराव महाराजांची पालखी ‘महाल बागेत’ आल्यावर परिसरातील निऱ्हाळे, कणकोरी, माळवाडी, सुरेगाव, खंबाळे, पांगरी, निमोण, सायखेडा, नांदूरशिंगोटे, मानोरी, दोडी, वावी, घोटेवाडी, सिन्नर आदि गावांतील भाविकांनी आपापले ‘देव’ महालबागेत भेटीसाठी आणले. रात्री १२ पासून पहाटे ६ पर्यंत वाघे मुरळीच्या जागरणाचा कार्यक्रम झाला.
यात्रेत नवसपूर्तीसाठी भाविकांनी भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. यात्रेमुळे परिसर पिवळ्याधमक भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. यात्रेत मेवा, मिठाई, खेळणी, भंडारा, पेढे, खोबरे, रहाटपाळणा, प्रसाद, भांड्यांची दुकाने थाटली होती. त्याच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
चार दिवस सुरू असलेल्या यात्रोत्सवाची सांगता मंगळवारी करण्यात आली. चार दिवसांत हजारो भाविकांनी प्रतिजेजुरी मऱ्हळ येथील निऱ्हाळे रस्त्यालगत असलेल्या महालबागेतील खंडेराव महाराजांच्या पालखी दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने कुणी नवसपूर्ती करत होता, तर कुणी लोटांगण घालून शरण येत होता. अनेक जण खाऊ, खेळणी घेण्यात दंग होते. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा समिती व जय मल्हार मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)